<
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूलचा स्पोर्ट्स डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी तसेच उद्घाटक म्हणून आशिष कासट उपस्थित होते. टायर रोलींग करुन त्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी शाळेच्या संचालिका सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. नंतर मुलांना सर्व कालबाह्य झालेले तसेच मैदानी खेळ खेळवण्यात आले. यामध्ये लंगडी, कबड्डी, खो-खो, लगोरी, गोट्या, टायर रोलींग, मामाचे पत्र हरवले हे खेळ तसेच मुलींसाठी मातीचे भांडे बनवून भातुकलीचा खेळ खेळवण्यात आले. हे खेळ खेळताना मुलांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी आशिष कासट यांनी मुलांना खेळामधे करीयर करण्याच्या अनेक संधी विशद करुन त्यासाठी पुर्वतयारी कशी करावी, योग्य व्यायाम व आहार तसेच योग्य मार्गदर्शन कसे मिळवावे याविषयाचे मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी प्रामुख्याने सध्याच्या सामाजिक स्थितीमधे वावरताना काय काळजी घ्यावी याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. नंतर शाळेचे अध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी यांनी आपले जुने खेळ किती आरोग्यदायी होते यावर मार्गदर्शन केले. यावेळी पाळधी गावातील सरपंच चंदू माळी, शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह उज्वला झंवर, राधिका उपाध्याय, विजया मोरे, गुणवंत पवार, सतीश पाटिल, अश्विनी ठाकरे हे उपस्थित होते तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.