<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील बी यु एन रायसोनी शाळेत “तंबाखूमुक्त शाळा अभियान” कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद चे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज मोहम्मद खान शिकलगर, मुख्याध्यापिका रेखा कोळंबे, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांची उपस्थिती होती. शिक्षणासोबतच व्यसनमुक्त पिढी घडवणे ही शाळांची जवाबदारी असून शाळांनी त्यासाठी विविध उपक्रम राबवावे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात विजय पवार यांनी केले. जळगाव शहरातील सर्व शाळांनी तंबाखुमुक्त शाळा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद शिकलगर यांनी स्वत:चे अनुभव विद्यार्थ्यांना सांगून व्यसनापासून लांब राहण्याचा उपदेश केला. व्यसनाच्या दुष्परिणामांची सविस्तर माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली. दोन विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी व्यसनमुक्ती ची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन उपशिक्षिका किर्ती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ रेखा कोळंबे, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.