<
जळगाव : ‘ढिल ढिल दे दे रे भैया’ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत खेळीमेळीच्या चढाओढीत क्षणाक्षणाला ‘ओ काट, ओ भाग’ असे म्हणत पतंग उडवण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रसंग होता श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील. निमित्त होते. मकरसंक्रांतीच्या सणाचे.
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये पतंग महोत्सवाने मंगळवारी मकरसंक्रांती सण साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या सर्व मुलांनी अध्ययनमुक्त राहत शाळेच्या क्रीडांगणावर सकाळच्या आल्हाददायी आणि गुलाबी थंडीच्या वातावरणात एकाच वेळी पतंग उडवत आनंद साजरा केला. मकरसंक्रात हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती मुलांना व्हावी ह्या हेतूने विद्यालयाचे उपशिक्षक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी व शाळेचे शिक्षक यांनी एकत्रितपणे पतंगबाजीचा आनंद घेतला. विद्यार्थ्याना सणवारांची माहिती व्हावी याकरिता सदरचा उपक्रम राबविण्यात आला होता.
पतंग महोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी मुलांना मकरसंक्रांतीच्या सणाविषयी माहिती दिली. मकरसंक्रांतीला सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करत असल्याने हा एक संक्रमणाचा सण असून या दिवसापासून हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते. तसेच दिवस मोठा व रात्र लहान होण्यास सुरुवात होते, यामुळे ह्या सणाला धार्मिकते सोबत शास्त्रीय महत्वसुद्धा मुलांना मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी सांगितले. मुलांनी या वेळी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.