<
उडाण फाउंडेशन जोपासतेय सामाजिक बांधिलकी;फाउंडेशन चे उल्लेखनीय कार्य
जळगाव-(प्रतिनिधी)- शहरातील रूशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलीत उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील गतीमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी उद्या दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत निधी संकलनासाठी सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उडानच्या संचालिक हर्षाली चौधरी यांनी दिली.
गेल्या तीन वर्षापासून दिव्यांग व गतीमंद मुलामुलींसाठी उडान फाऊंडेशन कार्यरत आहे. गेल्या काही वर्षापासून दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या वाढतच असून संस्थेसाठी देणगीचे प्रमाण नगण्य आहे. दिव्यांग विद्यार्थी तयार करीत असलेल्या वस्तूंच्या विक्रीतून येणार्या नफ्यावरच संस्थेचे कार्य अवलंबून असते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी निधी संकलीत करण्याचे नियोजन उडान फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.
500 वर स्पर्धकांचा सहभाग
उद्या दि.26 रोजी दुपारी 4 वाजता खान्देश सेंट्रल मॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील 60 शाळा, महाविद्यालयातील 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात 30 जिल्हा परिषद आणि मनपा शाळांचा देखील समावेश आहे. कार्यक्रमासाठी खान्देश सेंट्रल मॉल, एबीएस जीम, इम्पॅक्ट फोटो, चिरमाडे साऊंडचे सहकार्य लाभणार आहे.
निधी संकलनासाठी आवाहन
उडानतर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी देशभक्तीपर गीत, सामुहिक गीत, समुह नृत्य, रॉक बॅन्ड सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या दानशूर व्यक्तींना दिव्यांगांच्या पंखाना बळ देण्यासाठी सहाय्य करायचे असेल ते त्याठिकाणी 1 रूपयापासून आर्थिक मदत देवू शकतात. तरी जळगावातील अधिका-अधिक नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन उडानच्या संचालिक हर्षाली चौधरी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला हितेश पाटील, दिप्तेश चौधरी वसीम खान, चेतन वाणी आदी उपस्थित होते.