<
लोकसहभागातून आदिवासी भागात महिला सक्षमीकरणासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमांना डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी यांची भेट
जळगाव-प्रतिनिधी :- गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फ बा-बापू 150व्या जयंतीवर्षनिमित्त चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथे लोकसहभागातुन वनबंधारा खोलीकरणाच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. यासह अंबापाणी पाझर तलाव, वैजापूर व शेणपाणी पाझर तलाव पुननिर्माणासह आदिवासी महिलांसह शेतकऱ्यांना स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रकल्पांचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले.
गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ विश्वस्त दलिचंद जैन, सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ गांधीयन राधाबेन भट, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ. अंबिका जैन, वनविभागाचे जिल्हा अधिक्षक पी. टी. मोराणकर, विभागीय वनअधिकारी समाधान सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक वसंत पवार, वनपाल बी. डी. कुंवर, पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या उपस्थित सर्व प्रकल्पांचे उद्घाटन झाले. बोरअजंटी गावातील ग्रामस्थांच्या आवाहनास प्रतिसाद देत लोकसहभागातून वनबंधारा खोलीकरण निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे 9.90 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी अडविले जावून लाखो लिटर पाणीसुद्धा जिरवले जाणार आहे. 30 जानेवारी पर्यंत असलेल्या श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये बोरअजंटीचे सरपंच खुमसिंग पाडवी-बारेला, अशोक पाटील, गोरख धनगर, दिपक धनगर, नितीन कोळी, शिवदास कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक, महात्मा गांधीजींच्या विचारधारेतील समाजकार्य पी. जी. डिप्लोमातील विद्यार्थी, भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, आदिवासी सेवा मंडळ संचलित आश्रमशाळा बोरअजंटी येथील विद्यार्थी, बोरअजंटी गावातील ग्रामस्थ व युवाशक्ती श्रमदानात सहभागी झाले. पशुचिकित्सा केंद्रातील सहकारी सहभागी झाले. या प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शनासह विशेष सहकार्य व परिश्रम जैन इरिगेशन सिस्टिमचे इंजिनियर व सर्वेअर टिम ने केले. प्रकल्प यशस्वीतेसाठी सागर चौधरी, चंद्रकांत, सुधीर पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सर्व सहकारी प्रयत्न करीत आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न
अंबापाणी पाझर तलाव, वैजापूर व शेणपाणी पाझर तलाव पुननिर्माणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. कोरडवाहूवरून आता शेतकरी दुबार पीक घेत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या शेती परवडत असल्याचे दित्तरसिंग बारेला, विजय राजपूत या शेतकऱ्यांनी सांगितले. वैजापूर येथे वाडी प्रकल्पाअंतर्गत परसबाग विकास, गांडुळ खत निर्मिती, गंगा मॉं प्रकल्प, बीज साठवण प्रकल्प, मशरूम उद्योग यामाध्यमातून सातपुडा महिला बचत गट, ओम साई महिला गट, आदिवासी विकास महिला संयुक्त जबाबदारी गटातील महिलांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळाला आहे. असे गट प्रमुख अलका कोळी म्हणतात. या सर्व प्रकल्पांना डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. गांधी रिसर्च फाउंडेशन आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न करेल असे प्रोत्साहनही दिले. जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानातून टिश्यूकल्चर केळी, पांढरा कांदा आंतरपीक पद्धतीचे प्रात्यक्षिक नागलवाडी येथील शेतकरी सुनील वानखेडे यांच्या शेतावर मान्यवरांनी बघितले.
सोलरवर सूतकताई उद्योग
बोरअजंटी महिला संयुक्त जबाबदारी गटाच्या प्रमुख इंदुबाई जगन बारेला यांच्यासह दहा महिलांनी मिळून सोलरवर सूतकताई उद्योग उभारला आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे या महिलांना आवश्यक असणारे तंत्रज्ञान दिले जाते तसेच त्यांच्याकडून सूत सुद्धा विकत घेतला जात आहे. यामुळे त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला असल्याचे गटातील महिला म्हणतात.