<
जळगाव : शहरातील मानसी बागडे या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र अंनिसने समविचारी जिल्हा महिला असोसिएशन यांच्यासह मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यांनी जात पंचायतीची तक्रार दाखल करून घेण्यास अंनिसच्या कार्यकर्त्याना अनुकुलता दर्शवली आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध मागण्यांद्वारे वस्तुस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे आणि सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी जिल्हाधिकार्यांसमोर मांडली. मानसीने जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असे शुक्रवारी २४ रोजी अंनिसने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती दिली. त्यावरून मानसीचे शवविच्छेदन करता आले. मानसीच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिक यांनी आत्महत्या लपविल्याचे त्यावेळी समोर आले.
निवेदनात, मानसीने गळफास घेतल्यावर तिला कोणी मृत घोषित केले ? तिला सरकारी दवाखान्यात का नेण्यात आले नाही ? पोलिसांना का कळविले नाही ? मानसीचा मृत्यू झाल्यावर तिचा अंत्यविधी समाजानुसार व्हावा यासाठी तिच्याकडून दंड का व कोणी वसूल केला ? यात कोण सामील होते ? घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी का तपासले नाही ? संशयित आरोपी दिनकर बागडे हे कोणाला घाबरून मानसीच्या लग्नाला विरोध करीत होते ? असे सवाल करीत अंनिसने या घटनेमागे जातपंचायतच कारणीभूत असावी असा आम्हाला दाट संशय आहे. त्या दिशेने पोलीस अधिकार्यांनी चौकशी करावी, पुरावे जमा करावे आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये दोषींना अटक करून कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.
निवेदन देतांना कायदेविषयक व्यवस्थापन विभाग जिल्हा सचिव अॅड. भरत गुजर, अॅड.डी.एस.भालेराव, जितेंद्र धनगर, आर.एस.चौधरी, महिला असोसिएशनचे राजकुमारी बालदी, भारती पाथरेकर, वैशाली पाटील, बिंदिया नांदेडकर, हेमलता रोकडे, मंगला नगरकर उपस्थित होते.