<
जळगावच्या विराज कावडीया यांना मिळाला मंचावर बसण्याचा मान
जळगाव : भारतीय छात्र संसदेचे नवी दिल्ली येथे पुढील महिन्यात आयोजन करण्यात आले असून मंगळवारी पुणे येथे कोथरूडला त्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना. रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आले. भारतीय छात्र संसदेला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून सुमारे ८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक म्हणून निवड होऊन केंद्रीय मंत्र्यांसोबत बसण्याचा मान जळगाव येथील विराज कावडीया या तरुणाला मिळाला.
भारतीय छात्र संसदेचे छात्र संसदेचे हे दहावे वर्ष आहे. भारतीय छात्र संसद फौंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आहे. २० ते २३ फेब्रुवारी २०२० रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. त्याची प्राथमिक माहिती देण्यासाठी आणि त्यांचा घंटानाद करण्याचा कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संयोजक राहुल कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, भारतीय छात्र संसदेचे मुख्य समन्वयक कप्तान डी.पी.आपटे, भारतीय छात्र संसदेचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया (जळगाव) उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया यांनी भारतीय छात्र संसदेचा आढावा घेत, विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी तरुणांना माहिती देण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. ना.रमेश निशंक म्हणाले की, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य आणि भारताचे मानवतावादी दर्शन जगात मार्गदर्शक आहे. ज्ञानाधारित महाशक्ती होण्यासाठी देशातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत देशातील युवांमध्ये जगातील समस्या संपविण्याची ताकद आहे असे त्यांनी म्हटले.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू याचे मुख्य पालक आहेत. संसदेत चार दिवस कलाकार, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, राजकीय नेते आदि मार्गदर्शन करणार आहेत.यात ८ सत्रे होणार असून यात सोशल मिडिया, दहशतवाद, नक्षलवाद, लोकसंख्या, दारिद्र्य निर्मूलन, अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर त्यात चर्चा घडून येणार आहेत. भारतीय छात्र संसदेत जिल्ह्यातून ८० हून अधिक तरुणांची नोंदणी झाल्याचे यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडिया यांनी सांगितले. ज्यांना सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी संदीप सूर्यवंशी (९४२२२ २२२९९), मनजित जांगीड (९४२२२ ३०२१८) यांचेशी संपर्क साधावा.