<
गाव संकल्पना राबविणार : वैशाली विसपुते
जळगाव- जिल्ह्यातील निधी फाऊंडेशनकडून मासिक पाळी कापडमुक्त अभियानअंतर्गत नशिराबादजवळील निमगाव दत्तक घेण्यात येणार आहे. महिला दिनानिमित्त लवकरच गावात कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी मासिक पाळी कापडमुक्त अभियान हाती घेतले आहे. गेल्या वर्षी निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाळधीजवळील पोखरीतांडा गाव दत्तक घेण्यात आले होते. गावातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन वर्षभर मोफत दिल्यामुळे उपक्रमाचा मूळ उद्देश सफल झाला. महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे महत्त्व समजले व त्याची सवय लागली. गाव कापडमुक्त झाले.
निमगावला दिली भेट
पोखरीतांडानंतर दुसऱ्या गावाचा शोध सुरू केला असता बस देखील पोहचत नसलेल्या निमगाव बद्दल वैशाली विसपुते यांना समजले. मंगळवारी वैशाली विसपुते यांनी निमगावला भेट दिली. निमगावातील सरपंच प्रियंका रविंद्र पाटील व इतर महिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गाव दत्तक घेणार असल्याचे सांगितले.
कापडमुक्त गाव संकल्पना देशभर राबविणार
मासिकपाळीबद्दल अद्यापही देशात अनेक समज, गैरसमज आहे. कापडमुक्त अभियान व्यापक प्रमाणावर सामाजिक दातृत्वाची गरज आहे. समाजातील दानशूर मंडळी, संस्थांनी पुढाकार घेतल्यास मासिक पाळी, कापडमुक्त अभियान देशभर राबविण्याचा मानस असल्याचे निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सांगितले.