<
लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक
संगमनेर (प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे मोठे असून विद्यार्थी व कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून अहमदनगर व नासिक येथे तातडीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वीत करावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीत आ.तांबे यांनी ही प्रमुख मागणी केली.यावेळी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,कृषीमंत्री ना.दादा भुसे,आ.लहु कानडे,आ.किरण लहामटे,आ.मोनिका राजळे,मुख्य सचिव अजय मेहता, विभागीय आयुक्त राजाराम माने, प्रधान सचिव एकनाथ डवले यांसह सर्व आमदार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. याअंतर्गत महाविद्यालयांची संख्याही खूप मोठी आहे. गुणवत्तापुर्ण विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या सोयीच्या दृष्टीने नगर व नाशिक येथे 13 ऑगस्ट 2014 ला निर्णय झाला मात्र साडेचार वर्ष होवूनही याबाबद अद्यापही कोणतीही कार्यवाही नाही. वेळोवेळी मागण्या झाल्या, विधानपरिषदेतही अनेक वेळा हा विषय चर्चेला गेला अहमदनगर व नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र स्थापनेसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र बांधकामासाठी शासन निधी देत नसल्याने अनेक विद्यालये व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. म्हणून सरकारने तातडीने हा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावून अहमदनगर व नासिक येथे तातडीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.यावर मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर – नाशिक उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करण्यासंदर्भात येत्या आठवड्याभरात निर्णय घेण्याचे सकारात्मक संकेत दिले.यामुळे हे उपकेंद्र लवकर सुरु होणार असल्याने नगर – नाशिक मधील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.