<
जळगाव-(जिमाका) – पशुसंवर्धन विभागाने जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा उत्पन्नाचे उद्दिष्ठ ठेवून नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
येथील अजिंठा शासकीय विश्राम गृहात पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाची आढावा बैठक मंत्री केदार यांनी घेतली. यावेळी आमदार सुरेश भोळे, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त संजय गायकवाड यांच्यासह दुग्ध विकास, क्रीडा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री केदार यांनी पशुसंवर्धन विभाग, दुग्ध विकास, क्रीडा विभागाचा आढावा घेतला.
मंत्री केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना, पशूपालकांना उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई जाणवायला नको. त्यादृष्टीने चारा निमीर्तीचे नियोजन करा. आपल्याकडे मोठी यंत्रणा असल्यावर पशूपालकांना चाऱ्यासाठी भटकंती करायला लागू नये. अनेक अधिकारी ग्रामीण भागातील आहेत. पशुंना चारापाणी मिळाले तर ते जगतील. पशुपालन फक्त ग्रामीण भागात होते. जर ग्रामीण भागात चारा पाणी मिळाले नाहीतर ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे अधिक संख्येने येतील. तसे व्हायला नको यामुळे गावातच चारा मिळायला पाहिजे असे नियोजन करा.
मंत्री केदार म्हणाले की, मला दर महिन्याला कोणत्या अधिकाऱ्यांनी किती ठिकाणी कॅम्प घेतले, त्याचे आउटपूट काय, किती जणांना फायदा झाला याचा लेखी अहवाल पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्री म्हणाले, की राज्यात अंडी विकत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अंड्यांचे उत्पादन कमी होते. उत्पादनापेक्षा आजच्या स्थितीत एक कोटी अंड्यांची रोजची मागणी अधिक आहे. ती आपण पुरवू शकत नाही. नागपुरला एकाने छोटा शेडनेट तयार करून त्यावर सोलर बसवून लहान पोल्टीफार्म तयार केला आहे. तसे लहान पोल्ट्री फार्म तयार करण्यास प्रोत्साहन द्या. यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. त्यांना शेडनेट, सोलर पॅनल उपलब्ध करून द्या.
दुग्ध व्यवसायाचा आढावा घेताना सर्व दुध उत्पादकांनी एकत्र येत “महानंदा’चे बळकटीकरण करण्याचे आमचे उद्दीष्ठ आहे. शेतकऱ्यांच्या घरात दुध विक्रीजून रोजचा पैसा येतो. त्यातून त्याचे कुटुंब चालते. यामुळे दुध उत्पादकाला सक्षम करण्यासाठीचे धोरण लवकरच तयार केले जाणार आहे. सहकारी संस्था, संघ टिकला पाहिजे तो वाढविला पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.