<
युवाशक्ती फौंडेशनने शुक्रवारी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची अजिंठा विश्रामगृह येथे घेतली सदिच्छा भेट
जळगाव : येथील युवाशक्ती फौंडेशनने शुक्रवारी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची अजिंठा विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत क्रीडा विकास आणि युवक कल्याणाकरिता जळगावात प्रभावी उपक्रम राबवावे तसेच समस्या सोडवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
प्रारंभी नवी दिल्लीत होत असलेल्या १० व्या भारतीय छात्र संसदेबद्दल व युवाशक्ती फाऊंडेशन बद्दलची प्राथमिक माहिती मंत्री केदार यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात अनेक तालुक्यात क्रीडांगणे तयार झालेली नाहीत. खेळाडूंसाठी भरीव निधी व प्रोत्साहन शासकीय पातळीवर मिळत नाही याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. तसेच भरकटत असलेल्या आजच्या तरुणांची वैचारिक बांधणी विवेकी आणि मूल्याधिष्ठित करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पातळीवर युवक कल्याणाकरिता योजना राबवाव्यात अशी विनंती करण्यात आली.
दरम्यान मंत्री केदार यांनी तरुणांना वेळेचे व्यवस्थापन करता येत नाही अशी खंत व्यक्त करीत सोशल मिडिया तरुणांनी प्रभावी वापरला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. महाशक्ती होण्यासाठी देशातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत देशातील युवांमध्ये जगातील समस्या संपविण्याची ताकद आहे असे ते म्हणाले. यावेळी युवाशक्ती फौंडेशनचे सचिव अमित जगताप, श्रेयस मुथा, सौरभ कुळकर्णी, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.