<
इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची भूमिका अजरामर करणारे चरित्र अभिनेता.ए. के. हनगल यांची आज १ फेब्रुवारी जयंती.
ए.के.हंगल यांचं पूर्ण नाव होतं अवतार कृष्ण हंगल…पाकिस्तानातल्या सियालकोट प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. या प्रांतातली अनेक कुटुंब त्यावेळी इंग्रजांच्या नोकरीत समाधान मानायचे. मात्र हंगल यांच्या मते ही गुलामगिरी होती….हंगल साहेबांना कम्युनिस्ट विचारसरणीचं आकर्षण होतं. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. अनेकदा त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं.
फिल्ममधला रोल कितीही छोटा असला तरी आपल्या अभिनयाने तो संस्मरणीय करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. थिएटर करुन आल्याने त्यांच्यातील ताकदवान अभिनेता सहज जाणवायचा. सिनेमामध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकं गाजवली. तर काही नाटकांचं लिखाणही केलं.
सुकलेल्या चेहऱ्यातही चमकणारे डोळे आणि आतवर भिडणारा आवाज याच्या जोरावर ए.के.हंगल यांनी अनेक चरित्र भूमिका अजरामर केल्या. . सरकारी अधिका-र्यांचा मुलगा असूनही आपल्या वडीलाच्या इच्छे विरुद्ध त्यांनी शिप्याचे काम करण्याचे ठरवले. इंग्लंड येथे प्रशिक्षित एका शिंप्याकडून त्यांनी ५०० रुपये गुरुदक्षिणा देवून शिवणकामाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. हंगल हे उत्तम शिंपी होतेशिलाईकाम हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवयास होता पण, ते सच्चे स्वातंत्र्यसैनिक होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर हंगल यांचे कुटुंब कराचीत स्थायिक झाले होते. तीन वर्ष पाकिस्तानातील तुरुंगात कारावास भोगलेले हंगल १९४९ साली भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर मुंबईत डेरेदाखल झाले. हौशी रंगभूमीवर काम करीत असलेले हंगल यांना चित्रपटांमधून काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट जगतात यावे लागले. रंगभूमीशी जवळीक असणारे हंगल इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी ते फार पूर्वीपासून जोडलेले होते. बलराज साहनी आणि कैफी आजमी यांच्या साथीने इप्टा या नाटय़चळवळीत सक्रिय झाले. त्यांचा हा मैत्रीचा धागाच बहुधा त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत घेऊन आला असावा.
चित्रपटसृष्टीत त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं ते तब्बल ५०व्या वर्षी. मात्र त्यानंतरही त्यांची फिल्मी कारकीर्द ४५ वर्षांची राहिली. वर्ष १९६६ मध्ये बासू भट्टाचार्य ह्यांच्या तिसरी कसम ह्या चित्रपटात ते प्रथम पडद्यावर दिसले. त्यानंतर प्रख्यात दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी एका नाटकात हंगल साहेबांचा अभिनय पाहिला आणि आपल्या ‘गुड्डी’ फिल्मसाठी त्यांनी जया बहादुरीच्या वडिलांचा रोल त्यांना दिला. त्या नंतर मात्र त्यांनी एक उत्कृष्ट चरित्र अभिनेता अशी ख्याती मिळवली. त्यांची रामू काका हि भूमिका अतिशय प्रसिद्ध आहे.
जया आणि हंगल साहेब या दोघांच्याही कारकीर्दीची ही सुरुवात होती. त्यानंतर हंगल साहेबांनी तीसरी कसम, बावर्ची, शागीर्द, शोले सारख्या चित्रपटातून अनेक चरित्र भूमिका निभावल्या. ४५ वर्षांच्या फिल्मी कारकीर्दीत हंगल साहेबांनी सव्वा दोनशेहून अधिक चित्रपटात काम केलं. बासू चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी, गुलजार, बी.आर.चोपडा, रमेश सिप्पी या सगळ्या दिग्दर्शकांची चरित्र भूमिकांसाठी पहिली पसंती असायची ए.के.हंगल. विशेषत: हृषिदांचा त्यांच्यावर विशेष जीव. या दोघांमधलं हे नातं नमक हराम, बावर्ची आणि अभिमानपर्यंत सुरुच राहिलं.
आमिरच्या ‘लगान’मध्ये गावच्या मुखियाचं पात्रही अनेकांच्या लक्षात राहिलं. लगानच्या शूटिंगवेळी त्यांना कंबरदुखीचा तीव्र त्रास होत होता. शूटिंग दोन महिने थांबवावं लागेल अशी आमिर खानला भीती वाटत होती. पण हंगल साहेबांची जिद्द एवढी की ते सेटवर अँम्बुलन्समध्ये आले. वेदना सहन करत त्यांनी शॉट ओके केला आणि नंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले.
नव्वदच्या दशकात फिल्म इंडस्ट्रीने त्यांना काही काळ दूर ठेवलं. दोन वर्षे त्यांना कुठल्याच चित्रपटाची ऑफर मिळाली नाही. पत्नी आणि सूनेच्या निधनानंतर त्यांची अवस्था आणखी बिकट झाली. मात्र त्यांनी कुणापुढे हात पसरले नाहीत. मुंबईतील सांताक्रूझमध्ये एका छोट्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. आपल्या आजारपणात त्यांना उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अनेकजण त्यांच्या मदतीसाठी सरसावले. पण मानी स्वभावाच्या हंगल यांना ही मदत घेताना किती त्रास झाला असेल याची कल्पनाच न केलेली बरी…
या हरहुन्नरी कलाकाराला वृध्दापकाळाने मात्र पार मोडून टाकले होते. हंगल यांचा मुलगा विजय हंगल हे हिंदी चित्रपटसृष्टीतून छायाचित्रकार म्हणून निवृत्त झाले आहेत. बापलेक दोघांनाही एकाचवेळी वृध्दापकाळाला सामोरे जावे लागल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. महिन्याकाठी पंधरा हजार केवळ औषधोपचारांसाठी द्यावे लागत असल्याने हंगल कुटुंबिय हलाखीच्या परिस्थितीत पोहोचले होते. ही माहिती प्रसिध्दीमाध्यमांनी प्रकाशझोतात आणल्यानंतर त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक सहकलाकारांनी त्यांना मदतीचा हात दिला. अभिनेत्री जया बच्चन यांनी तर तुमच्या मुलीला तुमची ही परिस्थिती माहिती नव्हती, अशी माफी मागत त्यांच्यावरील उपचारांच्या खर्चाचा सारा भार उचलला. त्यापाठोपाठ मिथुन चक्रवर्ती, गिल्ड असोसिएशन, सलमान खान यांनीही आपापल्या परीने हंगल यांना आर्थिक मदत केली. हंगल यांनी यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा उतारवयात सांभाळ करणारा एखादा अनाथाश्रम असावा, अशी मागणीही केली. त्यांच्यानिमित्ताने ज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्नांना वाचा फुटली. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीनेही ए. के. हंगल यांच्यासारख्या समर्थ अभिनेत्याबद्दल असलेली आपली आदराची भावना व्यक्त केली. चरित्रात्मक भूमिकांमध्येही आपल्या अभिनयाने जान ओतणारा हंगल यांच्यासारखा कलाकार विरळाच.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)