<
जळगाव-(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी 16 कलमी कार्यक्रम केंद्रसरकारने हाती घेण्याचे ठरविले ही चांगली बाब आहे. कृषी व कृषी पूरक योजनांसाठी 1 लाख 51 हजार 518 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सौर कृषी पंप योजनेवर भर देण्यासाठी भारतभरातून सुमारे 20 लाख सौर कृषि पंप बसविण्याचे उद्दिष्ट शेती सिंचनासाठी आशादायी चित्र ठरू शकेल. करार शेती, शाश्वत पीक पद्धती, सेंद्रीय शेती, शेतीपूरक उद्योग या केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्याऱ्या राज्य सरकारांना प्रोत्साहन अनुदान देखील दिली जाईल त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सकारात्मक आणि फायद्याचे होईल. कृषी उडान योजनेतून आदिवासी भागातील शेती उन्नत करणे, अशा प्रकारे चौफेर विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आशादायी म्हणता येईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना ही प्रोत्साहन मिळणार आहे.
या संपूर्ण अंदाजपत्रकात जैन इऱिगेशन म्हणून बघितले तर जैन इरिगेशन काम करीत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात भरघोस काम करण्याची संधी या बजेटने उपलब्ध करून दिलेली आहे. शेती, शेतकरी आणि जैन इरिगेशन एक अतूट नाते या निमित्ताने अधिक दृढ होईल.
शेतकरी केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या बजेटबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन!
– अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सि. लि. जळगाव