<
जळगाव-(प्रतिनिधी)-येथील कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने पिडीत व मयत मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी तक्रारदार त्यांच्या आई बानो आनंद बागडे यांच्या परिवाराला जात पंचायतीच्या पंच व संबंधितांकडुन निर्माण दहशत निर्माण झाली आहे. झालेल्या दहशतीमुळे व जीवीतास संभाव्य धोक्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव येथील मानसी बागडे या युवतीने कंजरभाट जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून दिनांक २३ जानेवारी रोजी गळफास लावुन आत्महत्या केली होती. परंतु, कंजारभाट जात पंचायतीच्या समाजावरील अर्निबंध नियंत्रणामुळे व जबर दहशतीमुळे आत्महत्या केलेल्या मानसी बागडेच्या आई बानो आनंद बागडे यांनी आत्महत्येची माहिती प्रथम तपास नोंदीच्या वेळी लपवून ठेवली होती.
महाराष्ट्र अंनिसने केलेल्या विधायक हस्तक्षेपामुळे जात पंचायतीच्या दबावात अंत्यविधी उरकण्यापूर्वी मानसी बागडेच्या मृत शरीराचे शव विच्छेदन केल्यानंतर तिने गळफास लावुनच आत्महत्या झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यानंतर केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्यातुन आणि राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीसांकडुन मिळालेल्या सहकार्यातुन काल दिनांक ३१ जानेवारी रोजी बानो आनंद बागडे यांच्याकडून कंजरभाट जात पंचांच्या विरोधात पुरवणी जबाब नोंदविण्यात आला आहे.
मात्र जात पंचांशी संबंधित नातेवाईक व इतर बानो आनंद बागडे यांच्याशी वाद करून त्यांच्यावर मानसिक दडपण निर्माण करीत आहेत. त्या सध्या अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शिवाय त्याच्यांवर तक्रार मागे घेण्यासाठी सर्व मार्गांनी दबाव येत आहे, तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बानो आनंद बागडे यांना पोलीस संरक्षण जावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा काही हिंसक, विपरीत प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी शासन, प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा कायदा व्यवस्थापन विभाग प्रमुख ऍड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी, शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी आदी उपस्थित होते.