<
एमटीव्हीच्या वसाहतवाद काळात जगभरातल्या संगीतप्रेमी व नृत्यभक्तांनी ‘शकिरा’ची सांगीतिक घोडदौड सुरुवातीपासून अनुभवली. पुढे सलग दोन फुटबॉल वर्ल्डकपना अधिक उत्स्फूर्त वलय आणले ते (हिप्स डोन्ट लाय आणि वाका वाका) तिच्या नादावणाऱ्या गाण्यांनी. त्यानंतर शकिरा हे नाव माहिती असायला संगीत वा नृत्यप्रेमी असण्याची गरज उरली नाही. स्पॅनिश वंशाच्या कोलंबियन असलेल्या गायिका शकीराचा 2 फेब्रुवारी जन्मदिवस.
बिनधास्त गाणी व डोळ्यांसमोर ‘चमत्कार’ शब्दाची फोड करणारे नृत्यचापल्य, यांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांत महती दुमदुमण्याशिवाय पर्यायच तिने ठेवला नाही. दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च किताब म्हणून ओळखला जाणारा ‘पर्सन ऑफ द इयर’ हा सन्मान कलात्मक आणि सामाजिक योगदानाबद्दल जाहीर झाला. गिटारगुरू कार्लोस संताना, लॅटिन गानसम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी क्युबाची ग्लोरिया इस्तेफान आणि सुपरिचित रिकी मार्टिन यांच्या पंक्तीत लोकप्रियतेच्या दृष्टीने हे कोलंबियन पाखरू अंमळ उशिराने दाखल झाले, तरी तुलनेने फारच लहान वयात तिने यशाच्या या पल्ल्यालाही नामोहरम करण्याची कामगिरी केली.
शकिरा इसाबेल मेबराक रिपोल हे लांबडे नाव घेऊन कोलंबियाच्या बॅरनक्विला प्रांतात पॉपस्टार बनण्याची स्वप्ने पाहणारी शकिरा आपल्या पहिल्या दोन फ्लॉप अल्बम्सनंतरही संगीताचा ध्यास सोडायला तयार नव्हती. दक्षिण अमेरिकेतील समृद्ध नृत्यसाहाय्यक संगीतविश्वात तिची गाणी फिकी पडत होती. पुढे तिने एक बँड स्थापित केला व आपला खणखणीत म्युझिक ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवला. २००२ साली ‘व्हेनेव्हर, व्हेनेव्हर’ या इंग्रजी गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय पटलावर दाखल होऊन तुडतुडय़ा, रबरी लवचीकतेच्या शरीराचे आणि मादक आवाजाचे दर्शन तिने जगाला दिले. एका रात्रीत ती स्टार झाली नाही. दक्षिण अमेरिकेतील तिच्या लोकप्रियतेची मात्रा इतकी होती की तिला ग्लोबल बनवून नफा कमावण्यास संगीत कंपन्या आसुसल्या होत्या. त्या वेळी इंग्रजी गाणी लिहिण्यासाठी भाषांतरकारही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मलाच माझे गाणे लिहू द्या, हा हट्ट करत तिने इंग्रजी सुधारण्यावर दोन वर्षे खर्चली. ‘ग्लोबल फेम’ दोन वर्षांनंतरही तिच्यापासून दूर गेले नाही.
‘लॉण्ड्री सव्र्हिस’, ‘ओरल फिक्सेशन’ या अल्बम्सने शकिराने धमाल उडवून दिली. दोन मैत्रिणी खासगीत बोलायला धजणार नाहीत, ते तिने गाण्यांतून थेट मांडले. पारंपरिक लॅटिनो वाद्ये, रॉक, पॉप यांचे मिश्रण असलेल्या तिच्या संगीताचे उत्तम मार्केटिंग जोडीला असलेल्या असाधारण नृत्यकौशल्याने अधिक केले. लेखक गॅब्रियल गार्सयिा मारख्वेजपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत तिच्या दिग्गज चाहत्यांची यादी प्रचंड मोठी आहे. सहा कोटींहून अधिक अल्बमविक्री आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी तिच्या फाऊंडेशनने उभारलेला निधी आदी जमेच्या भरपूर बाबी तिच्या वैयक्तिक आयुष्यात आहेत. पेज थ्रीवर, गॉसिप मॅगझिन्समध्ये सतत झळकूनही यशाचे अपचन न झालेल्या या शतकातल्या महान संगीत कलाकारांच्या पंक्तीत तिचे नाव निश्चितच झळकणार आहे; त्यापुढे आज मिळत असणाऱ्या यशाच्या राशी नाममात्रच म्हणाव्या लागतील!
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)