<
मुंबई – (प्रतिनीधी) – सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू महापराक्रमी योद्धा. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेत त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘यावं: चंद्र दिवा करो’ अर्थात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाईल. तानाजीरावांच्या शौर्यकथा, छत्रपतींच्याप्रति असलेल्या निष्ठा आणि त्यांचे दैनंदिन जीवन यावर आधारित प्रसंगचित्र स्पर्धा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत राज्यपातळीवरील कलाविद्यार्थी, व्यावसायिक चित्रकार आणि हौशी चित्रकार भाग घेऊ शकतात. (अ) कला व कलेची आवड असणारा विद्यार्थी गट यांच्यासाठी प्रथम रुपये ८०००/- द्वितीय रुपये ६०००/- तृतीय रुपये ४०००/- आणि सन्मानचिन्ह तसेच (ब) खुला गट-कलाशिक्षक, व्यावसायिक आणि हौशी चित्रकार यांच्यासाठी प्रथम रुपये १५०००/- द्वितीय रुपये १००००/- तृतीय रुपये ७०००/- आणि सन्मानचिन्ह त्याचप्रमाणे प्रत्येक गटात ५ स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि आकर्षक सन्मानपत्र देण्यात येईल. यंदाचे वर्ष हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील महापराक्रमाचे ३५० वे वर्ष असल्याने संस्थेच्या वतीने ‘पराक्रमाची विजयगाथा’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे, पारितोषिकप्राप्त चित्रांचा समावेश या ग्रंथात करण्यात येणार आहे. संपादकीय मंडळावर महेशदादा मालुसरे (जामगाव-मुळशी), बाळासाहेब मालुसरे (निगडे-पुणे), प्रसाद मालुसरे (लव्हेरी-भोर), प्रदीप मालुसरे (कासुर्डी-भोर) आबासाहेब मालुसरे (अध्यक्ष,गोडोली-पाचगणी),रवींद्र मालुसरे (सेक्रेटरी-हडपसर) हे आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी आणि पत्रक मागविण्यासाठी मुख्य संपादक रवींद्र मालुसरे (मुंबई) यांच्याशी ९३२३११७७०४ किंवा ६१२, घरकुल को ऑप सोसायटी,बुसा इंड समोर, सेंचुरी बाजार लेन, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.