<
जळगाव : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र बाबूलाल धनगर यांची पुनर्निवड करण्यात आली असून शहर कार्यवाह म्हणून कल्पना शिरीष चौधरी यांची निवड शाखेच्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी जातपंचायतीवर गुन्हे दाखल होण्यासाठी 10 दिवसांपासून परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. जातपंचायती मोडून काढण्यासाठी अधिक सक्षमतेने लढण्याचा निर्धार करण्यात आला. जातपंचायतीविरुद्ध लढण्याचे अंनिसचे जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राबवायच्या उपक्रमाची प्राथमिक चर्चा करण्यात आली. यानंतर अंनिसच्या स्थापनेपासून गेली 30 वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करीत असलेले राजेंद्र चौधरी व त्यांच्या पत्नी सुरेखा चौधरी या दाम्पत्याचा सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाखेतर्फे प्रभा व भालचंद्र बावस्कर या दाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे यांच्या निरीक्षतेखाली शहर शाखा निवड झाली. शहराध्यक्ष म्हणून विकास निकम, उपाध्यक्ष विजय लुल्हे, बुवाबाजी विभाग अशफाक पिंजारी, वैज्ञानिक जाणिवा विभाग दिलीप भारंबे, विविध उपक्रम विभाग प्रभा बावस्कर, कायदा व्यवस्थापन विभाग ऍड.चेतना कलाल यांची निवड झाली. बैठकीला विश्वजीत चौधरी, जितेंद्र धनगर, शिरीष चौधरी, आर.बी.पाटील, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.आशिष जाधव उपस्थित होते.