<
कुलदीप कौर यांचा जन्म 1927 ला अखंड भारतातील लाहोर (आता पाकिस्तानात) अमृतसर जिल्ह्यातील अटारी येथील जमीनदार असलेल्या समृध्द जाट परिवारात झाला. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांचा विवाह महाराजा रणजीतसिंह यांच्या सैन्याचे जनरल कमांडर शामसिंह अटारीवाला यांचा नातू मोहिंदरसिंह सिद्धू यांच्याशी झाला. वयाच्या 16 व्या वर्षी पहिले अपत्य झाले. पतीच्या आग्रहावरून त्यांनी चित्रपटात काम करणे सुरु केले. कुलदीप यांचे स्वप्न होते अभिनेत्री होण्याचे त्यावेळेस लाहोरच्या चित्रपटसृष्टीत प्राण प्रसिध्द होते. त्यांना लाहोर येथील पंजाबी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. पण त्याचदरम्यान भारताची फाळणी झाली. त्यामुळे त्यांना प्राण यांच्यासोबत भारतात यावे लागले. यावेळचा एक किस्सा सदाअत मंटोच्या ‘स्टार्स फ्रॉम इदर स्काय – द बॉम्बे फिल्म वर्ल्ड ऑफ द 1940 या पुस्तकात सांगितला आहे. प्राण आणि कुलदीप मुंबईला परतले पण प्राण यांची गाडी लाहोरला राहिली होती. जातीय दंगे भडकलेले असताना कुलदीप एकट्या लाहोरला परत गेल्या आणि प्राण यांची कार चालवत दिल्लीमार्गे मुंबईला पोहचल्या. सदाअत मंटो यांच्या पुस्तकातील प्रकरणाचे शीर्षकच आहे कुलदीप कौर – द पंजाबी पटाखा.
मुंबईला आल्यावर बॉम्बे टॉकीजमध्ये त्यांनी नायिका होण्यासाठी स्क्रीन टेस्ट दिली. ही स्क्रीनटेस्ट जर्मन कॅमेरामन जोसेफ विर्सिंग यांनी घेतली पण त्यांना नायिकेऐवजी सहाय्यक अभिनेत्रीसाठी निवडण्यात आले. त्याकाळात नर्गीस, नसीम बानो, निम्मी, मधुबाला यासारख्या आघाडीच्या नायिका होत्या. यादरम्यान त्यांना चमन (1948) हा पंजाबी चित्रपट मिळाला. त्याचवर्षी आलेल्या बॉम्बे टॉकीजच्या देवआनंदच्या जिद्दी आणि गृहस्थी या चित्रपटात त्यांनी खलनायिकेची भूमिका केली. त्यानंतर खलनायिका म्हणून त्यांची कारकिर्द सुरु झाली. 1948 ते 1960 या 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपट केलेत. यात कनीज, एक थी लडकी, आधी रात, लाजबाब, मीनाबाजार, समाधि, अफसाना, करो सितारे, एक नजर, लेडीज ओन्ली, गुमास्ता, लचक, मुखडा, नई जिंदगी, राजपूत, स्टेज, अंजाम, बैजू बावरा, घुंगरु, हमरी दुनिया, जग्गू, नौबहार, नीलम परी, शीशम, आबशार, अनारकली, बाजी, घरबार, फार्मिश, मशूका, डाकबाबू, गुलबहार, हुकुमत, लालपरी, मस्ताना, डाकू, दुनिया गोल है, जश्न, मस्त कलंदर, मिस कोकाकोला, इंद्रलिला, इंकलाब, सुल्तान ए आलम, एक सा, जय अम्बे, महारानी, पैसा, पंचायत, सहारा, सिंदबाद का बेटा, चांद, जागीर, मोहर, प्यार की राहे, बडे घर की बहू, भक्तराज, माँबाप, रिक्शावाला, सुनहरी राते तीन या चित्रपटांचा समावेश आहे. यातील कनीज या चित्रपटापासून त्या खलनायिका म्हणून प्रसिध्दीस आल्या. समाधी (1950) व अफसाना (1951) या चित्रपटांनी खलनायिका म्हणून त्यांना प्रसिध्दीच्या शिखराव पोहचवले. 1960 साली आलेला यमला जाट हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. 1960 साली शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जातांना कुलदीप यांच्या पायाला काटा टोचला पण स्वभावाने बिनधास्त असलेल्या कुलदीप यांनी त्याची पर्वा केली नाही. काट्याची जखम चिघळली आणि धर्नुवाताने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्रींचा उल्लेख झाल्यावर स्मृतीपटलावर कुलदीप कौर यांचे नाव येतेच. आजही विस्मृतीच्या पटलातून ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या लक्षात राहिली आहे.
– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)