<
नवी दिल्ली – (न्युज नेटवर्क) – चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतातही या कोरोना वायरसने शिरकाव केला असून केरळमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देणारा मजकूर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबूक आणि ट्वीटरवरील कोरोनाविषयी चुकीचा मजकूर हटवण्यात येणार असल्याची माहिती खुद्द फेसबूक आणि ट्वीटरने दिली आहे. ब्लॉग पोस्ट करुन फेसबूकने ही माहिती दिली आहे
चीनमध्ये आतापर्यंत 17 हजार नागरिकांना कोरोना वायरसची लागण झाली असून मृतांची संख्या ही 361 वर गेली आहे.
तसेच विविध देशात कोरोना वायरसचे 130 संशयित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
फेसबूकने ब्लॉग पोस्ट करुन म्हटले की, कोरोना वायरससंबंधित चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संस्था आणि स्थानिक आरोग्य अधिका-यांनी सोशल मीडियावर कोरोणापासून बचावासंबंधित माहिती चुकीची आणि आरोग्याला हानी पोहचवणारी अशी आहे. त्यामुळे अशा चुकीची माहिती अथवा मजकूर पोस्ट करु नये आणि युझर्समध्ये संभ्रम निर्माण करु नये, असे आवाहन पोस्टद्वारे करण्यात आले आहे. तसेच हे मजकूर काढण्यात येतील असेही फेसबूकनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कोरोना विषाणुपासून बचावासाठी कोणतीही शीतपेये, आईस्क्रीम, सीलबंद दुथ तसेच 48 तासांपूर्वी दुधापासून तयार केलेली मिठाईचे सेवन करु नये, डेटॉल लिक्विड कोरोना व्हायरस रोखण्याचे काम करु शकतो, असा चुकीचा मजकूर सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या या सुचना असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डेटॉलची अफवा पसरली असल्यामुळे या अफवेला उत्तर देण्यासाठी डेटॉल कंपनीला समोर यावे लागले. लिक्विडच्या माध्यमातून कोरोना व्हायरस रोखणे अशक्य आहे, असं डेटॉल कंपनीने सांगितले. त्यामुळे चुकीच्या माहिती पसरवू नका शिवाय असल्यास त्यावर विश्वासही ठेवू नका.