<
जळगाव, दि. 7 (जिमाका) :- राज्यामध्ये सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण 35 लाख 53 हजार 334 हेक्टर क्षेत्र असून या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोयाबीन पीक लागवड वाढणाऱ्या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाणाची आवश्यकता भासणार आहे. राज्यात 2019 मध्ये उशिरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढण्याच्या कालावधीत अवकाळी पावसामुळे सोयाबिन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीज उत्पादन क्षेत्रावर उत्पादन झालेले बियाणे व तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्याची पेरणी करून उत्पादित केलेले बियाणे हे पुढील खरीप हंगामासाठी व्यवस्थितपणे राखून ठेवणे/साठा करून ठेवणे गरजेचे आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची शक्यतो आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाणांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापऱ्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो. प्रमाणित बियाणांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाणांची चाळणी करून निवड करावी. बियाणांची साठवण करण्यापूर्वी बियाणे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ताडपत्री/सिमेंटच्या खळ्यांवर पातळ पसरवून चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के पर्यंत आणावे. वाळवून स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या पोत्यात साठवून ठेवावे साठवणूक करताना सोयाबिन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेत असल्याने थंड ओलविरहित व हवेशीर जागा निवडावी, शेतकऱ्यांनी अधिक मार्गदर्शन तथा मदतीसाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा कृषी कार्यालय किंवा तालुका कृषी कार्यालय, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यकांशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.