<
उर्दू आणि हिंदी शायरीच्या माध्यमातून जगाचं दुःख मांडणारे जिंदादिल शायर निदा फाजली यांचं दि. 8 फेब्रुवारी पुण्यस्मरण.
रझिया सुल्तान, सूर, सरफरोश अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. जी गाणी आजही लहान थोरांच्या ओठांवर असतात. लफ्झों के फुल, मोर नाच, सफर मे धूप तो होगी, दुनिया एक खिलोना है. हे त्यांचे काही गाजलेले काव्य़संग्रह प्रसिद्ध आहेत.
निदा फाजली हे उर्दू शायरीच्या क्षेत्रातलं एक वजनदार नाव आहे. दिल्लीत जन्म झालेल्या निदा फाजली याचं वास्तव्य मुंबईत होतं. उर्दू गजलेलं सर्वसामान्य कानसेनांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय ज्या जगजीतसिंह यांच्याकडे जातं, त्यांनी निदा फाजली यांच्या सर्वाधिक रचना गायिल्या आहेत, लोकप्रिय केल्या आहेत.
निदा फाजली यांच्या रचना अर्थगर्भ आणि चिंतनशील कविता मानल्या जातात. ते अनेक अर्थाने बंडखोरही होते. ते एका उर्दू मुशायऱ्यासाठी पाकिस्तानात गेले असताना, तिथल्या कट्टरपंथीयांनी त्यांना घेराव घातला. निदा फाजली यांच्या रचनेवर त्यांना आक्षेप होता. माणसाला सदैव नाडणारी व्यवस्था, ती चालवणारे शासक, व्यवस्थेमुळं भरडून निघणारी माणसं आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेलं वास्तव निदा फाजलींना अस्वस्थ करत होतं. शोषकांच्या प्रश्नाला सतत होकारार्थी उत्तर देऊन परिस्थिती आणखी बिघडवून कशासाठी घेता, कधी तरी ‘नाही‘ म्हणायला शिका, शोषणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश त्यांनी जनसामान्यांना दिला. निदाजी एका अर्थानं शोषितांचा प्राणशब्द होते.
ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजलींच्या शायरीतून जनसामान्यांची परवड प्रकटली हे खरं, ती दूर करण्यासाठीच त्यांनी आपलं शब्दसामर्थ्य वापरलं. सामाजिक एकतेचं स्वप्न साकारावं, यासाठी त्यांच्या लेखणीतून कधी निखारे पेटले; कधी फुलं बरसली. त्यांच्याविषयी.
‘फलकपे लिखी जाती है कहानी सिर्फ उनकी, कलाम से कागजही नहीं, दीदारों की रूह छू जाती है कलम जिनकी,‘ असं ज्यांच्या शायरीबद्दल म्हणता येईल, त्या उर्दू शायराचा स्वर निमाला. मुक्तदा हसन निदा फाजली असं त्यांचं नाव. ‘निदा‘चा अर्थच मुळी आवाज! सर्वसामान्य माणसाच्या आक्रंदनाला त्यांनी शायरीतून आवाज दिला. ‘हरेक घरमें दिया भी जले, अनाजभी हो,‘ अशा आशयाचं पसायदानच त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे. कबीर, तुलसीदासांचा प्रभाव घेऊन सुरू झालेल्या त्यांच्या कवितेला यथाशीघ्र स्वतःची वाट सापडली. मात्र त्यांच्या कवितेचं, शायरीचं अंतःसूत्र मात्र माणसाचं दुःख, माणसाच्या वेदना आणि माणसाचं जगणं हेच राहिलं. माणूस सुखी झाला पाहिजे, हे त्यांच्या शायरीतलं अध्यात्म होतं.
‘घरसे मस्जिद है बडी दूर, चलो ये कर लें, किसी रोते हुए बच्चेको हॅंसाया जाए,‘ असं त्यांनी लिहिलं आणि त्या ओळींचा मतितार्थ न सापडल्यानं गहजब झाला; पण निदा फाजली निर्भीड होते. त्यांनी सांगितलं, की मशिदी बनवण्यात माणसांचे हात गुंतलेले असतात, मुलांना तर प्रत्यक्ष अल्ला घडवतो. त्यांच्या या सांगण्यानं कट्टरपंथीयांचा रोष कमी झाला. अनेक शहरांतल्या गल्लीबोळात राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पळालं आहे, त्यांचं जगणं बोथटलं आहे. आपलं बाल्य हरवलेली ही मुलं भटकताना दिसतात, तेव्हा निदा फाजलींचं काळीज पिळवटून निघतं. सुख, समाधान, आनंद कुठं आहे, याचा शोध घेताना ते म्हणतात, ‘रहेगी कबतक वादोंमे कैद खुशहाली, हरेक बार कल क्यूं? कभी तो आज भी हो‘
निदाजींचं भारतावर निरतिशय प्रेम होतं. या देशातल्या माणसांवर प्रेम होतं. म्हणूनच त्यांचे कुटुंबीय कायमचे पाकिस्तानात गेले तरी त्यांनी आपला देश सोडला नाही; पण नंतरच्या काळात राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळं ते व्यथितही झाले. सामान्य माणसाच्या शक्तीला दुर्बल समजण्याची चूक करू नका, सत्ता उलटवून टाकण्याची ताकद त्यांच्यात असते, असं त्यांनी बजावलं होतं. हिंदू-मुस्लिमांमधील अंधश्रद्धा, वर्णव्यवस्थेवरही त्यांनी प्रहार केले. राज्यकर्त्यांनी मंदिर-मशीद बांधण्याचे उद्योग कशाला आरंभले, अर्थात याशिवाय ते दुसरं करणार तरी काय, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
आधी प्रेम करायला शिका, म्हणजे जगायला आपोआप शिकाल, असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. ‘रजिया सुलतान‘पासून त्यांची बॉलिवूडमधली मुशाफिरी सुरू झाली; पण आशयाशी तडजोड करणारी गीतरचना त्यांनी केली नाही. ‘कभी किसीको मुक्कमल जहां नही मिलता, कहीं जमीं तो कही आसमां नही मिलता,‘ या ओळी ऐकताना कवीचं मनस्वीपण प्रत्ययाला येतं. प्रत्येकजण बोलू शकतो; पण संवाद मात्र हरवला आहे. अग्नीशीच दोन हात करायचे असतील, धुराचं कीर्तन कशासाठी? हा कुसुमाग्रजांना पडलेला प्रश्नही निदाजींनी विचारला होता.निदा फाजली यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1938 चा. कविता कोश मधील नोंदीनुसार त्यांचं मूळ नाव मुक्तदा हसन असं होतं. मुक्तदा हसन याचं बालपण ग्वाल्हेरमध्ये गेलं, ग्वाल्हेरमध्येच त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर ते मुंबईत आले.
निदा फाजली हे मुक्तदा हसन यांनी कविता लेखनासाठी धारण केलेलं नाव आहे, पण निदा फाजली याच नावाने ते सर्वत्र परिचित झाले. याच नावाने त्यांनी सिनेमातील गाणीही लिहिली. कमाल अमरोही यांच्या रजिया सुल्तान या सिनेमासाठी त्यांनी सर्वप्रथम गीतलेखन केलं. कमाल अमरोही यांच्या रजिया सुलतानचे गीतकार जां निसार अख्तर होते, मात्र त्यांच्या निधनानंतर अमरोही यांनी अख्तर यांच्याच सल्ल्यानुसार निदा फाजली यांच्याशी संपर्क केला आणि फाजली यांचा सिनेमाच्या गीतलेखन क्षेत्रात प्रवेश झाला.
निदा फाजली या लेखनासाठी धारण केलेल्या नावामागे एक निश्चित असा विचार होता. त्यामध्ये निदा म्हणजे स्वर… आवाज, ध्वनी.. तर फाजली म्हणजे मुक्तदा हसन यांच्या पूर्वजाचं काश्मीरमधील एक गाव. या गावातूनच त्यांचे पूर्वज पुढे दिल्लीत स्थायीक झाले आणि भारत-पाकिस्तान फाळणीमध्ये पाकिस्तानात गेले. मात्र निदा फाजली यांनी भारतातच राहणं पसंत केलं. ग्वाल्हेरमधील शिक्षण आणि उमेदवारीचा काळ संपवून ते कामाच्या शोधात 1964 ला मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या साप्ताहिक आणि नियतकालिकांसाठी लेखन केलं. पुढे पाच वर्षांनी म्हणजे 1969 साली त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. 1998 साली निदा फाजली यांना साहित्य अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं. तर 2013 साली पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला.
-योगेश शुक्ल (9657701792)