<
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता धुळे येथील जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांचे हस्ते होईल. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.मोहन पावरा, डॉ.प्रीती अग्रवाल, डॉ.सुभाष चौधरी, जजीमविप्र संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ काटकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख उपस्थित राहतील.
उद्घाटनानंतर लगेचच एकांकिका सादर होणार आहेत. यात डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची “शाली”, बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची “लाल चिखल” , नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील “ चिमणी”, एमजीएम संस्था, चोपडा महाविद्यालयाची “ रंगबावरी”, एमएसव्ही महाविद्यालय, धुळेची “ एक रात्र वैऱ्याची” या पाच एकांकिका सादर होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पारितोषिक वितरण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी व संघानी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.