<
जळगाव-(प्रतिनिधी) – दि.२६आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्हयात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त होणाऱ्या इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी 29 जुलै 2019 रोजी तहसिल कार्यालय,भुसावळ आवरात असलेल्या शासकीय धान्य गोदामात भारत इलेक्ट्रॉनिक लि.बेंगलोर येथील अभियंत्यामार्फत करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित केलेले आहे.त्यानुसार जळगाव जिल्हयातील राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हयाध्यक्षांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणीसाठी तहसिल कार्यालय,भुसावळ आवारातील शासकीय धान्य गोदामात उपस्थित राहता येईल. गोदाम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोदामात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या चाचणीस सामोरे जावे लागेल तसेच गोदामात कुठल्याही प्रकारच्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाता येणार नाही. मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपसणीचे व्हीडीओ चित्रीकरण तसेच सी.सी.टी.व्ही द्वारे देखील चित्रण केले जाणार आहे.तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.