<
जळगांव(प्रतिनीधी)- विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले असून राज्याच्या शिक्षण विभागाकडूनही विविध उपाय योजना केल्या जात आहेत. या आधारावरच एक अभिनव उपक्रम प.न.लुंकड कन्याशाळेत राबवला जात असून, यातून विद्यार्थीनींच्या पाठीवरचे ओझे कमी होणार आहे. हा उपक्रम सध्या ७ वीच्या एका वर्गात प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे. ८ वीच्या विद्यार्थीनींकडून मागच्या वर्षाचे म्हणजे ७ वीचे पुस्तक जमा करून वर्गात ठेवण्याचे नियोजन केले आहे. सातवीच्या विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे असणारे पुस्तक घरीच ठेवायची म्हणजे दररोज दप्तरात आणायची आवश्यकता नाही वर्गात ठेवलेल्या पुस्तकांचा वापर करावा यातून दप्तराचे वजन ५०% पेक्षा जास्त कमी होईल व दप्तराचे वजन कमी होईल. या उपक्रमातील पुस्तक ही वर्गातील कपाटात ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. या उपक्रमाद्वारे पालकांना विनंती करण्यात आली की आपण आपल्या मुलींना सर्व वह्या या १०० पेजेस घ्याव्यात व इतर गरज नसलेले साहित्यही विद्यार्थीनीं बरोबर दप्तरात पाठवू नये असे सांगितल्याने दप्तरातील वजन कमी झालेले दिसून आले. भावी पिढीच जर शारीरिक, मानसिक दृष्टीने सक्षम नसेल तर चांगले नागरिक कसे निर्माण होतील. या वजनामुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे हे डाॕक्टरांनी देखील सांगितले आहे, म्हणून या वर्षी एका वर्गासाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला जात असून पुढील वर्षी इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थीनींसाठी राबवण्याचा मानस आहे. सदर उपक्रम शाळेतील उपक्रमशील उपशिक्षक प्रवीण हिरालाल धनगर यांच्या संकल्पनेतून राबवला जात असून, त्यांना अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा. सुशील अत्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य मा. प्रेमचंद ओसवाल, शरदचंद्र छापेकर, शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. सदर उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
निरागस चेहऱ्यांवर दुःख होत ते फक्त दप्तराच्या ओझ्याच या मुली आनंदी कशा होतील म्हणून वजन कमी करण्याचा उपक्रम हाती घेतला व तो यशस्वी होवून दप्तराचे ओझे कमी झाले याचे मनस्वी समाधान आहे.प्रवीण धनगर- उपशिक्षक प.न.लुंकड कन्याशाळा,जळगाव
हा उपक्रम राबवल्यामुळे खरच दप्तराचे वजन ४ किलोने कमी झाले. आमचे वर्गशिक्षक प्रवीण धनगर यांनी सांगितले की १०० पेजेस वह्या वापरा यामुळे देखील दप्तराचे ओझे कमी झाले.मानसी शांताराम पाटील- विद्यार्थीनी इ.७ वी ब
शाळेत जातांना व शाळेतून घरी येतांना दप्तराच्या आझ्यामुळे मुलं खूप थकून जातात आपण राबवत असलेल्या उपाययोजनांचे पालक म्हणून मी स्वागत करतो.संजय महाजन- पालक