<
जळगाव : शब्द आणि संवाद हे अभिनयाचे महत्वाचे अंग आहे. आयुष्यातील जगणे सुंदर करण्याची ताकद कलेत आहे. जीवनातील अस्वस्थ्यता नाटकातून मांडता येते. हेच काम नूतन मराठा महाविद्यालयाच्या “हलगी सम्राट” मधून दिसून आले आहे, असे प्रतिपादन धुळे येथील जेष्ठ रंगकर्मी व साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांनी केले.
नूतन मराठा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १० जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता धुळे येथील जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जजीमविप्र संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ काटकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. नटराज पूजन करून दीपप्रज्वलन करीत स्पर्धेचे उद्घाटन घंटानाद करून झाले. प्रस्तावनेत प्राचार्य डॉ. देशमुख यांनी, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून अशा स्पर्धांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.अनिल सोनार यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मानपत्र देऊन चेअरमन काटकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. प्रा.पंकजकुमार ननवरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा.सोनार म्हणाले की, यशाला अंतिम पायरी नाही. नाट्यक्षेत्रातील प्रगतीचे मापन एकांकिका स्पर्धेतूनच समजते. कला अफाट सागरासारखा असून कला क्षेत्रातील व्यक्तीने सतत शिकत राहिले पाहिजे. काळानुसार नाटके निर्माण करणे गरजेचे असून स्वत:ला प्रगल्भ करीत राहावे. स्वल्पविराम, प्रश्न, सूचना नाटक सादर करताना गरजेचे आहे. आयुष्यात आपल्याला काय व्हायचे आहे हे महत्वाचे आहे, असेही प्रा.सोनार म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रा.माहुलीकर यांनी विद्यार्थ्यांना स्व-परीक्षणासाठी स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यापीठ संयोजन समिती सदस्य प्रा.शाम सोनवणे, प्रा. खेमराज पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जे.पाटील, प्रा.डॉ.आर.बी.देशमुख,प्रा.डॉ. एस.ए.गायकवाड, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पी.आर.बागुल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.राहुल संदानशिव, प्रा.घनश्याम पाटील, दिग्दर्शक हनुमान सुरवसे, प्रा.डॉ.अफाक शेख, प्रा.डॉ.डी.आर.चव्हाण, प्रा.डॉ.डी. एल.पाटील, प्रा. एस. एम. वानखेडे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, तासिका
प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
एकांकीकातून सामाजिक प्रश्नांची मांडणी
उद्घाटनानंतर लगेचच एकांकिका सादर झाल्या. यात डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची “शाली” मध्ये नाट्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या “शाली” ची कहाणी दिग्दर्शिका काजल तायडे यांनी मांडली आहे. शालिनी कोळी हिने उभारलेल्या “शाली”ला दाद मिळाली. घर सोडून जळगावी येते आणि नाट्य स्पर्धेत भाग घेऊन कशी यश मिळविते ते शालीचे चित्रण चांगले साकार झाले. लेखन रुपाली गुंगे हिचे होते. धनश्री जोशी लिखित नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील “ चिमणी” एकांकिका दीपनगरच्या औष्णिक विद्युत केंद्रावर आधारित होती. औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीची राख शेतकर्यांच्या शेतात पडून त्यांना व त्यांच्या परिवाराला किती त्रास होत आहे याचे चित्रण यात मांडण्यात आले आहे. राखेमुळे नापीक झालेली जमीन, दम्यामुळे ग्रस्त शेतकर्याची मुलगी यामुळे शेतकर्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत रसिकांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली. दिग्दर्शन बुद्धभूषण अहिरे याचे होते.
बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची “लाल चिखल” या एकांकिकेत बापू नामक शेतक-याच्या मुलाची व्यथा मांडण्यात आली आहे. शालेय शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, शेतकरी बापाची जगण्यासाठीची तगमग एकांकिकेत दाखविण्यात आली. शेवटी त्याच्या उत्पादनाला भाव न मिळाल्यामुळे त्याच्या अस्वस्थतेतून दिसून आलेली मन:स्थिती रसिकांना विचार करायला लावणारी ठरली. लेखन विशाल जाधव यांचे तर दिग्दर्शन व बापुची भूमिका श्रीकांत दाभे यांनी केली. एमजीएम संस्था, चोपडा महाविद्यालयाची “ रंगबावरी” मध्ये १६ व्या वर्षीच विधवा बनलेल्या चिमीची घालमेल आणि लग्नाआधीचे प्रेम मिळविताना विधवा आईशी करावा लागत असलेला संघर्ष उभा करण्यात आलेला आहे. रंग आणि स्पर्शाचा हा लढा दिग्दर्शक वैष्णवी सोनार हिने चिमीची भूमिका करणाऱ्या साक्षी वाणीच्या माध्यमातून मांडला आहे. लेखन संदीप दंडवते यांनी केले आहे.