<
जळगाव-(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद]पोलीस विभाग ,महिला बाल विकास विभागाकडे असलेल्या महिलांसाठीचे समुपदेशन केंद्राप्रमाणेच जळगाव महानगर पालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सूरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अजिंठा विश्रामगृह,जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे , महापौर सिमा भोळे, बेटी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाडे,महिला बालविकास अधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना पुढे सांगितले की, जळगावात मनपाकडील होणारे समुपदेशन केंद्र हे शहरातील महिलांना सोईचे होईल अश्या ठिकाणीच राहणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य तसेच पाठपुरावा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राहिल असेही रहाटकर यांनी यावेळी सांगितले. समुपदेशन केंद्रासाठी MSW सारख्या समाजकार्याचे शिक्षण झालेल्या व्यक्तींची निवड करण्यात येईल. समुपदेशन केंद्र व्यवस्थित चालावे समाजातील सर्व महिला घटकांना समान न्याय मिळावा कुणीही महिला न्यायापासून वंचित राहू नये म्हणून महानगरपालिकेसोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , महिला बाल विकास विभाग यांचे सहकार्य असणे आवश्यक असून तशी त्यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
विभक्त कुटुंब पध्दतीमुळे अगदी किरकोळ वाटणारे कौटुंबिक वाद वाढून ते थेट न्यायालयापर्यंत जातात आणि म्हणून अशावेळी समुपदेशन केंद्राची भुमिका अत्यंत महत्वाची असते. समुपदेशन केंद्र विवाहपूर्व व विवाहानंतरच्या सर्व घटकांना समुपदेशन करेन.महिला आयोग महिलांमध्ये त्यांच्यासाठी उपयुक्त अशी प्रज्ज्वला योजनेचा प्रचार व प्रसार करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही योजना विविध शिबिरे आणि कार्यशाळा घेवून पोहचविण्याचे काम करित आहे.सोबतच त्यांना त्यांच्या हिताचे कायदे,बचत गटांच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक हातभार, समाजात त्यांचा मान-सन्मान अबाधित ठेवणे अशा प्रकारे कार्य करित असून बचत गटांचे उद्दोगात रूपांतर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येते.
गाव,तालुका,जिल्हा पातळीवर तसेच नगरपरिषदा ,महानगरपालिकां ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापित करून महिलांना त्यांच्या न्याय मागण्यांसाठी प्रत्येक वेळेस मुंबईला येण्याची भविष्यात आवश्यकता भासू नये हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.