<
जळगाव: येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंगणघाट येथील घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी बाब व काळा दिवस असल्याच्या भावना प्रा. सोनल पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरात महिलांवर असे अत्याचार करणारे विकृत जन्माला येऊ न देणे हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, असेही त्या म्हणाल्या. या घटनेचा खटला जलदगतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील, तर न्यायव्यवस्थेने अशा खटल्यांचा जलद न्यायनिवाडा करून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य करायची कुणाची हिंमत होणार नाही, असे सांगितले. तसेच रायसोनी इस्टट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनीसुद्धा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. स्वप्नील देशमुख आदि शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.