<
जळगाव : मानसी बागडे आत्महत्येप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगावतर्फे जिल्हा महिला असोसिएशन व सर्व पुरोगामी समविचारी संघटना संस्थांच्या सहकार्याने दि. १ मार्च २०२० रोजी एकदिवसीय ‘जात पंचायतीला मूठमाती राज्यस्तरीय परिषद’ जळगांव येथे १ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संयोजित करणार आहोत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 2013 साली जात पंचायत मूठमाती अभियान सुरू केले. नाशिक येथे झालेल्या ऑनर किलींगच्या घटनांमागे जात पंचायतचा दबाव असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शोधुन काढले. तेव्हापासून जात पंचायतचे भयावह वास्तव समोर आले आहे.जातीचे नियम मोडल्यास शारीरिक शिक्षा करणे, आर्थिक दंड करणे, वाळीत टाकणे, कौमार्य परिक्षा घेणे, उकळत्या तेलाच्या कढईतुन नाणे बाहेर काढणे, महिलांच्या योनी मार्गात मिरचीची पूड कोंबणे, हातावर लालबुंद केलेली गरम कुर्हाड ठेवणे, मारहाण करणे, खुन करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी प्रकारच्या शिक्षा केल्याची उदाहरणे समोर आली. महाराष्ट्र अंनिसने राज्यभर मोहीम राबवली व तक्रारी दाखल केल्या. नाशिक,लातुर, जळगाव, महाड,पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले. प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरला. परिणामी महाराष्ट्र शासनाने जात पंचायतच्या मनमानी विरोधातील सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला. महाराष्ट्र अंनिसने या कायद्याचा राज्यभर प्रचार आणि प्रसार केला.
जळगाव येथे मानसी बागडे या तरूणीने दि. 23 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. मानसीच्या आत्महत्येमागे कंजारभाट जात पंचायतीचा दबाव आहे, हे महाराष्ट्र अंनिसने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लगेचच कळविले होते. त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे झाले. कंजारभाट समाजच्या पंचावर गुन्हे दाखल होईपर्यन्त महाराष्ट्र अंनिसने प्रशासनावर दबाव कायम ठेवला. महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने आजपर्यन्त पंधरा जात पंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत.परंतु कंजारभाट समाजातील दाहक अस्तित्व आजही कायम आहे. पंचांची दहशत इतकी आहे की तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने राज्यस्तरीय जात पंचायत मूठमाती परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. जळगाव येथे रविवार दिनांक 01 मार्च 2020 रोजी ही एकदिवसीय परिषद होईल. महाराष्ट्र अंनिस , महिला असोसिएशन व समविचारी संघटना यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जात पंचायत विरोधी लढणारे कार्यकर्ते, पिडीत, कायदेतज्ञ, विचारवंत आदिंच्या उपस्थितीत ही परिषद होईल. जात पंचायतीने पिडीत व्यक्ती आपले दाहक अनुभव कथन करतील. तरी महाराष्ट्रातील कोणत्याही जात पंचायत, गावकीने पिडीत व्यक्ती, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी या परीषदेत सामिल होण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे (8788494631), शहर बुवाबाजी विभागाचे अशफाक पिंजारी (९८२३३७८६११) यांच्याकडे नाव नोंदणी करावी. तसेच महाराष्ट्र अंनिस, महिला असोसिएशन व समविचारी संघटना यांच्या वतीने तयारीसाठी बैठकीचे नियोजन दि. १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. इच्छुकांनी हजर रहावे, असे आवाहन शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, शहर कार्यवाह कल्पना चौधरी, जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे यांनी केले आहे.