<
जळगाव-(प्रतिनिधी)-ऑक्सीजन….जगण्यासाठी सर्वात आवश्यक प्राणवायु. आॕक्सीजन नसेल तर गुदमरण्याचा अनुभव यायला सुरूवात होते. ज्या प्रमाणे चालत्या फिरत्या व्यक्तींना याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे संस्थांना देखील. त्यातही या संस्था जर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या असतील तर त्यांना तर याची सर्वाधिक आवश्यकता भासते. आणि अश्याच सामाजिक संस्थांसाठी जणू प्राणवायू ठरत आहे हेल्प फेअर. काय आहे हेल्प फेअर आणि सेवाभावी संस्थांसाठी नेमके काय कार्य करते, याचा नेमका या संस्थांना कसा, किती आणि काय लाभ झालाय आणि होतोय या गोष्टींचा घेतलेला हा आढावा संस्था चालकांच्या शब्दांत येत्या 15 ते 17 फेब्रुवारी 2020 दरम्यान सागर पार्क जळगाव येथे पार पडणाऱ्या हेल्प फेअर 3 च्या पार्श्वभूमी वर.
सौ. हर्षाली चौधरी – उडान फाऊंडेशन, जळगाव.
दोन वर्षापूर्वी मला हेल्प फेअर बद्दल कळाले. सामाजिक संस्थांची अशी प्रदर्शनी आपल्या जळगाव शहरात प्रथमच होत होती. त्यापूर्वी उडानचे काम सुरुच होते. पण हेल्प फेअर मध्ये पहिल्याच वर्षी सहभाग नोंदविला आणि या प्लॅटफॉर्म वरुन एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत उडानचे कार्य गेले. आमच्या सारखे कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना भेटण्याची आणि त्यांच्या कार्याची पद्धती समजण्याची संधी मिळाली. यातील काही संस्थासोबत मिळून लवकरच काही प्रकल्पांवर काम करण्याचा मानस आहे. हेल्प फेअरच्या माध्यमातून दिव्यांगांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात का असेना पण बदलतांना दिसतोय हे आशादायी चित्र आहे. गरजू आणि दानशूर यांना जोडणारा हेल्प फेअर हा एक सेतूच आहे.
श्री. सुनिल देवरे – रोशनी बहुउद्देशिय संस्था, पारोळा.
सामाजिक क्षेत्रात काम करतांना लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन दुर्दैवाने तसा वाईट होता. घरच्या भाकरी खा आणि लष्करी काम करा असा काहीसा हा प्रकार होता. परंतु हेल्प फेअर मध्ये सहभागी झालो आणि आम्ही नेमके काय कार्य करतो, कश्या परिस्थितीत करतो हे लोकांना या माध्यमातून समजायला लागले. हेल्प फेअरमुळे अनेक डाॕक्टर आणि एम.आर.शी आम्ही जूळले गेलो. त्यामुळे गरजू रुग्णांना मदत होण्यास हातभार लागला. रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी डाॕक्टरांची फळी या निमित्ताने उभी करता आली.
श्री. दत्ता तावडे – वृक्षवल्ली प्रतिष्ठान, पाचोरा.
आधी वृक्षवल्ली प्रतिष्ठानचे कार्य पंचक्रोशी पूरता मर्यादित होते. हेल्प फेअर बद्दल माहित झाले. या प्रदर्शन मध्ये सहभागी झालो आणि आमच्या कार्याची माहिती जिल्ह्यात झाली. यामुळे आमचे काम अनेकांपर्यंत पोहोचले. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहचणे आम्हाला शक्य झाले नसते ते हेल्प फेअरमुळे घडून आले. हेल्पफेअरने आमच्या कार्याला नवी ओळख दिली. सामाजिक संस्था चालवितांना काम कसे करावे, कामाला दिशा, गती कशी द्यावी हे हेल्प फेअरच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्यावर समजले. हेल्प फेअरमुळे ग्रामीण सोबतच शहरी लोक देखील आमच्या कार्यात सहकार्य करु लागले.
श्री. सागर धनाड – छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान, जळगाव.
हेल्प फेअरमुळे आम्हांला अनेकांना भेटण्याची, त्यांच्याशी जुळण्याची आणि आमचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची संधी मिळाली. पाणलोट, वृक्ष लागवडीचे महत्त्व या निमित्ताने लोकांना कळाले. हेल्प फेअरच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी मदत झाली आणि गाडेगाव येथे माथा ते पायथा पाणलोटाचं काम लोकसहभागातून शक्य झालं. या निमित्ताने सरपंच, गावकरी आमच्या मदतीला आले. आता या गावात सहली येतात. हेल्प फेअरमुळे सेंद्रिय शेतीच्या कामाला ओळख मिळाली. अनेकांनी सेंद्रिय शेतीची सुरूवात केली.
श्री. राजमोहम्मद शिकलगार – जन मानवता बहूउद्देशिय संस्था, चोपडा.
कँसर आणि कँसर रुग्णांविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आणि जनजागृतीचा अभाव आहे. हेल्प फेअर सारखे प्लॅटफॉर्म मिळाल्याने एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत जनजागृती करणे सोपे झाले. गेल्या दोन वर्षात हजारो लोकांशी हेल्प फेअरमुळे आम्ही जुळलो आहोत.
हेल्प फेअरमुळे आमच्या कार्याची दखल शासकीय अधिकाऱ्यांनी देखील घेऊन वेळोवेळी सहकार्य केले आहे. हेल्प फेअरमुळे अनेक रुग्णांना मदत मिळवून देण्यास हातभार लागला.