<
जळगाव – असं म्हणतात की गरजूंना दान करण्यासाठी कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या भिंती आडव्या येत नाहीत. या सर्व भिंतींच्या पलीकडे जाऊन गरजूंना आपल्या मिळकतीतील काही रक्कम दान करण्यासंदर्भाची शिकवण प्रत्येक धर्मात शिकविली आहे. पवित्र कुराण मध्ये देखील हीच शिकवण दिलेली आहे. आणि मोहम्मद पैगंबरांच्या या शिकवणीलाच अनुसरून कुठलेही बंधन न पाळता केवळ मानवता धर्म पाळून केवळ मानवतेसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांपैकी काहींना गुजरात पेन्ट्सतर्फे जकात फंडचा काही निधी दान करणार असल्याचा संकल्प गुजरात पेन्टसचे श्री. जावेद मेमन यांनी केला आहे.
”गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सागर पार्क येथे हेल्प-फेअरला भेट देत आहोत. येथे विविध क्षेत्रातील गरजूंसाठी काम करणाऱ्या संस्थांची माहिती आम्हाला एकाच छताखाली मिळाली. थोड्या-थोड्या गोष्टींबद्दल तक्रारी करणारे अनेक लोक आपल्या अवती-भवती आहेत. अश्या परिस्थितीत बऱ्याच साधनांची पुरेशी सोय नसतांना आणि अनेक गोष्टींचा अभाव असतांना देखील केवळ मनात सेवाभाव आहे आणि गरजूंसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे म्हणून तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या या संस्थांना आपल्या परीने जकात फंडातील काही अमानत दान करण्याचा विचार आला आणि त्यानुसार यावर्षी ही अमानत आम्ही दान करणार आहोत. मुस्लिम समुदायात काही कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्या पैकीच एक म्हणजे रमजान मध्ये जकात म्हणजेच दान करण्याविषयीची शिकवण आहे. प्रेषीत मोहम्मद पैगंबरांची ही शिकवण आहे की गरजूंना मदत करा. मदत करतांना जाती-धर्माच्या भिंती बांधू नका. आणि म्हणूनच आम्ही हेल्प-फेअर मधील संस्थांना दान करणार आहोत. – ( जावेद मेमन )
१५ ते १७ फेब्रुवारी २०२० असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्ती भेट देणार असून आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी आहे. त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मानवतेच्या या मंदिरांना म्हणजेच हेल्प-फेअरला सागर पार्क, जळगाव येथे सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत भेट द्यावी व यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.