<
महापौर भारती सोनवणे यांनी दिले निवेदन : अतिरिक्त 100 कोटींच्या निधीची देखील मागणी
जळगाव-(प्रतिनिधी)-शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 100 कोटींच्या विशेष अनुदानास मान्यता देण्यात आली होती. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे 42 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया करून जाहिर निविदा प्रसिध्द केलेली आहे. या कामांना लवकरच सुरूवात होणार असून त्यासाठी 100 कोटी अनुदानाची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महापौर भारती कैलास सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव शहरातील नागरिकांना विविध मूलभुत सेवा पुरविण्यासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत 100 कोटींचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या मंजुरीनंतर त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 42 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली तर 58 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
शासनाने मंजूर केलेल्या 100 कोटी निधीतून सर्वपक्षीय प्रभागातील कामांचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव शहराच्या थांबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी शनिवारी जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. सुरूवातीला पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे महापौर भारती सोनवणे यांनी स्वागत केले.
अतिरिक्त 100 कोटींची मागणी
जळगाव शहराचा विकास अनेक वर्षापासून रखडलेला आहे. शहरवासियांना मूलभुत सुविधा पुरविण्यासाठी आणखी 100 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याची बाब महापौर भारती सोनवणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पटवून दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील अतिरिक्त निधी देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.
निवेदनाद्वारे मागणी, मुख्यमंत्री सकारात्मक
शासनाने मंजूर केलेला निधी जळगाव शहर मनपाला लवकरात लवकर देण्यासाठी नगरविकास विभागाला आदेशीत करावे अशी विनंती करणारे निवेदन महापौर भारती सोनवणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे.
विकासाला सर्वांनी साथ द्यावी
जळगाव शहराच्या विकासासाठी आमच्याकडून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. मनपातील शिवसेनेची नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील जळगावच्या विकासासाठी साथ दिल्यास शासनाकडून विकासकामांसाठी निधी मिळू शकतो. आम्हाला कोणत्याही श्रेयवादात पडायचे नाही, आम्हाला जळगावचा विकास महत्वाचा आहे. भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्रितरित्या शासनाकडे मागणी केल्यास शासन नक्कीच सकारात्मकता दाखवेल. त्यामुळे सर्वांनी जळगावच्या विकासासाठी मी जळगावकर, माझे जळगाव म्हणून साथ द्यावी आणि आपापल्या पद्धतीने प्रयत्न करावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.