<
जळगाव-(जिमाका)-जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी महिला तक्रारदारांक्रडून एकूण 05 तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 04 अर्ज सहकार विभाग तर 01 अर्ज माध्यमिक शिक्षण विभागाकडील होते. प्राप्त सर्व अर्ज संबंधित विभागांकडून पाठवून देवून ते अर्ज निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सहकार व शिक्षण विभागास दिल्यात .
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, जिल्हा परिषदेचक उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था), विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रशासक व प्रतिनिधी, तक्रारदार महिला उपस्थित होत्या.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी माहे जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारीं अर्जांचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात महिला तक्रारदारांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर गावाहुन महिला तक्रारदार विशेष करून वयोवृध्द महिला असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण/निराकरण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत सर्व संबंधितांना दिला.