<
जळगाव- महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 140 मधील सुधारणांद्वारा विहीत केल्यानुसार टॅक्सी व रिक्षा यांच्या टपांवर रुफलाईट बसविणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार नविन नोंदणी होणाऱ्या मीटर्ड टॅक्सींच्या टपावर रुफलाईट बसविल्याची खात्री करूनच वाहनांची नोंदणी करण्यात येणार आहे.
काळ्या व पिवळ्या रंगातील टॅक्सी व ऑटोरिक्षांवरील रुफलाईट फिकट पिवळ्या रंगाचा आणि कुकॅबवरील रुफलाईट चंदेरी किंवा निळ्या रंगाचा असावा. टॅक्सीवरील अक्षरे पुढच्या बाजूने किंवा पुढील व मागील अशा दोन्ही बाजूंनी प्रदर्शित केलेली असली पाहिजे शिवाय ऑटोरिक्षावरील चिन्ह हे उप-नियम (6) मध्ये विहीत केलेल्या पध्दतीने पुढील पुढील बाजूने प्रदर्शित करण्यात आले पाहिजे.
परिवहन आयुक्त हे रुफलाईट बाबतचे विनिर्देशित करुन संकल्पनेस मान्यता देतील. मोटार कॅब सुरू असताना अथवा चालविण्यासाठी रस्त्यावर उभी असताना रुफलाईट सदैव योग्य प्रकारे प्रकाशित करण्यात आला पाहिजे नविन टॅक्सीवर रुफलाईट त्वरीत प्रभावाने बसविणे सक्तीचे असेल तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या टॅक्सीवर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणावेळी अथवा निश्चित दिनांकापासून रुफलाईट बसविणे सक्तीचे करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निर्णय घेईल आणि परिवहन आयुक्त विनिर्दिष्ट करतील त्या तारखेपासून ऑटोरिक्षांना रुफलाईट बसविणे बंधनकार असेल.
रुफलाईट बसविण्यासाठी परिवहन आयक्त, मुंबई यांनी 1) मे.टॉप्स ऑन मुव्ह, मुंबई 2) में. इन्स्पायर इंजिनियरींग प्रा.लि.मुंबई 3) मे. रिलिक्स इंडस्ट्रिज प्रा.लि.4) मे. लकी ई मोअर्स एलएलसी, मुंबई या उत्पादकांची नविन नोंदणी होणाऱ्या मीटर्ड टॅक्सींना सदर रुफलाईट बसविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.