<
सेवाभावी संस्थांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या मल्हार हेल्प फेअर-३ चा समारोप सोहळा उत्साहात संपन्न
जळगावकरांनी घेतली सेवाभाव जपण्याची सूर्य साक्षअनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या सद्बोधनाने झाला ३ ‘हेल्प-फेअर’ चा समारोप
जळगाव – (प्रतिनिधी)-गेल्या ३ दिवसांपासून जळगावकरांची समाजातील उपेक्षितांच्या अश्रुंवर फुंकर घालणाच्या हातांशी भेट घालून देणाऱ्या ‘मल्हार हेल्प फेअर-३’ चा भव्य समारोप सोहळा काल संपन्न झाला. अखेरच्या दिवशी अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या समारोपीय उद्बोधनाने जळगावकरांना मानवसेवेचे अमूल्य गुरुमंत्र मिळाले. लाईफ इस ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्प-फेअर मध्ये जळगावकरांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवून आलेल्या सेवाभावी संस्थांना कौतुकाची थाप दिली. या प्रदर्शनात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, दिव्यांग, मुक्त प्राण्यांसाठी कार्यरत आणि त्या प्रमाणेच अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ५० पेक्षा अधिक संस्थांचा समावेश होता. या संस्थांना मोफत स्टॉल देऊन त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देश्याने हेल्प-फेअर चे आयोजन करण्यात आले होते.
१५ ते १७ पर्यंत सागर पार्क मैदानावर सुरु असलेल्या या तीन दिवसीय सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून अनाथांची माई ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधुताई सपकाळ आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विकास पाटील जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील सह अनेक मान्यवरांसह हेल्प-फेअरचे कमिटीचे भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेनन, अमर कुकरेजा, नंदू अडवाणी, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा, आनंद मल्हारा व हेल्प-फेअर टीमचे सदस्य उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सिंधुताईंच्या हस्ते सन्मान
डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून त्यांना ‘स्वच्छतादूत पुरस्कार’ देण्यात आला. निरंतर प्रामाणिक सेवा देणारे रणजीत सनकत, विजेंद्र सौदे, वाराबाई सकट, आशा लोंढे, नरेंद्र गायकवाड या मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब गौरव करण्यात आला.
सांस्कृतिक मेजवानी, खाद्यजत्रा ठरले आकर्षणाचे केंद्र
हेल्प फेअर-३ मध्ये यंदा सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यजत्रेचे स्टॉल्स व सेल्फी-पॉईंट्स यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. फास्ट-फूड, चाट, चायनीज, पावभाजी, कुल्फी, स्नॅक्सच्या स्टॉल्सवर लोकांनी गर्दी केली. हेल्प-फेअर च्या शेवटच्या दिवशी शहरातल्या विविध संस्था, शाळा व समूहांनी आपापल्या कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. जलगाव पब्लिक स्कुल, बेंडाळे कॉलेज, अनुभूती स्कुल, उत्कर्ष मतिमंद शाळा, भगीरथ शाळा, योगा ग्रुप सोबत अनेक कलाकारांनी आपले सादरीकरण केले.
संस्थां चालकांसाठी कार्यशाळा
हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी विविध संस्थांच्या संचालकांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज आयोजित कार्यशाळेत मुंबई येथील शैलेश निपुनगे यांनी ‘केंद्रीय बजेट व स्वयंसेवी संस्था’ या विषयावर बोलतांना वित्तविधेयक, स्वयंसेवी संस्थांसाठी महत्वाच्या तरतुदी, कर भरणा, ८०जी नंतर कर दात्यांना टॅक्स मध्ये सवलत, आयकर कायद्याची माहिती, प्रशासकीय कामात येणाऱ्या समस्या सारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी संस्था चालकांतर्फे विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे उत्तर देतांना सरकारच्या जवाबदाऱ्या त्यांनी समजावून सांगितल्या व संस्थांचे मनोगत ऐकून आवश्यक ते बदल घडवण्याच्या दृष्टीने सरकारची भूमिका स्पष्ट केली.
हेल्प-फेअर म्हणजे सेवेकऱ्यांचं माहेरघरच आहे – सिंधुताई
जळगावकरांशी संवाद साधतांना डॉ. सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की ”जळगावशी माझी नाळ जुनी आहे. वयाच्या २०व्या वर्षी मी जळगावच्या पत्रे हनुमान मंदिरासमोर भिख मागायची, तेव्हा जेमतेम खायला मिळे. आज ५० वर्षांनंतर याच जळगावमध्ये सन्मानित व्हायला आली आहे म्हणून माझी कॉलर ताठ आहे.
माती, नीती आणि संस्कृती हातात हात घेऊन चालणारी भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. इथल्या मुली कणखर आहे, निर्भीड आहे. महिलांनी कधीच झुकायला नको. स्वतःला लाचार समजायला नको व पुरुषांनी देखील त्यांना मादी म्हणून नाही तर ‘माता’ म्हणून पाहायला हवे. मी तर फॉरेन रिटर्न नऊवारी आहे. माझी संस्कृती विसरणार कसं ? आपण देखील मातीशी जुळून रहावं. एकीकडे आज माझा सन्मान होतोय ते दुसरीकडे भूतकाळ डोळ्यासमोर आहे. हेल्प फेअर विषयी त्या म्हणाल्या की हेल्प-फेअर म्हणजे सेवेकऱ्यांचं माहेरघरच आहे. ही लोक खूप चांगले काम करत आहेत. स्वतः अंधारात राहून दुसऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या सेवाभावी लोकांना ही लोक उजेळात आणण्याचे काम करत आहेत.
संजय सावकारे –
सेवाकार्याचा कुंभमेळा मल्हार हेल्प फेअर-३ च्या समारोप सोहळ्याला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन प्रदर्शनाला आलेल्या सेवासंस्थांची माहिती जाणून घेतली. विविध माध्यमातून मानवतेचा संदेश देणारे सेवाव्रती व सेवाभावी संस्था पाहुन अगदी मनापासून आनंद झाला असे ते म्हणाले. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने शक्य झाले त्या माध्यमातून मानवतेचा वसा हाती घेतला पाहिजे व सेवाभावी संस्थांना पाठबळ दिले तर नक्कीच समाजातल्या उपेक्षित, वंचित घटकांचा विकास होईल असे ते म्हणाले. हेल्प फेअर-३ सर्वांना प्रेरणा मिळेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राजूमामा भोळे –
आमदार राजूमामा भोळे म्हणाले कि हेल्प-फेअर सारखे उपक्रम समाजाला दिशा देणारे ठरतात व जागरूक नागरिकांचे सृजन करतात. भारतात अनेक सामाजिक समस्या आहेत ज्यांचे निर्मूलन करणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे. हेल्प-फेअर हे नक्कीच प्रेरणादायी असून विशेषतः तरुणांना दिशा देणारे ठरेल.
डॉ. अविनाश ढाकणे – आपण सर्व समाजाचे देणं लागतो. हेल्प-फेअर आपल्याला हीच जाणिव करून देते. चांगले काम पाहणाच्या योग आला.