<
जळगाव.दि.20:- केंद्र शासनाच्या शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक, भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवायच्या असल्याने व यामध्ये कृषी व कृषीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देणे हा उद्देश असून शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गांवा समुह, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गाव समुह व बोदवड तालुक्यातील ऐणगाव गावसमुहाची निवड करण्यात आलेली आहे.
अभियानाचे उद्दिष्ट
ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामिण भागामध्ये उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करतांना, गरिबी व बेरोजगारी कमी करणे. अभियांतर्गत निवडलेल्या क्षेत्रांचा सर्वांगिण विकास करणे. ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे अशाप्रकारे उद्दिष्टये आहेत.
विकासाचे घटक :- कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रीया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा/उच्च शिक्षण सुविधा, स्वच्छता, नळाद्वारे पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गांव अंतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजीटल साक्षरता आणि नागरिक सेवा केंद्रे अशा प्रकारे एकूण 14 विकासाचे घटक आहेत. अशी माहिती सदस्य सचिव राष्ट्रीय रूरबन मिशन तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.