<
जळगाव, दि.23 – संसारात आलेल्या जिवाला जीवत्त्वाची प्राप्ति होण्याकरिता गुरुंचे सानिध्य होणे गरजेचे आहे. जन्माला आल्यानंतर मनुष्याने बालपन, युवावस्था व प्रौढ़ अवस्थेपर्यंत संसाराचे गाड़े ओढ़ावे त्यानंतर वृध्दावस्थेच्या काठावर बसलेल्यानी स्वत:चा उद्धार करण्याकरिता आपला अंत होण्याआधी त्या परमपिता परमात्म्याचे ध्यान भजन करून अनंत स्वरूप भगवंताची प्राप्तिचे मार्ग मोकळे करून घेणे गरजेचे आहे त्यातूनच स्वताच्या उद्धार होणार असल्याचा संदेश श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांनी भाविकांना दिला.
येथील शिवतीर्थ मैदानावर आमदार राजुमामा भोळे, श्री रामदेवजी बाबा सत्संग समिति आणि चैतन्य साधक परिवार समितितर्फे आयोजित सात दिवसीय भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृत सत्संत समारोहाला रविवारी सुरूवात झाली. यावेळी परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी, श्री वृन्दावन धाम पाल यांचे कृपापात्र शिष्य व विद्यमान गादिपति श्रध्देय संत श्री गोपाल चैतन्यी महाराज यांनी कथा श्रवण करीत असलेल्या हजारो भविकांना दिव्य संदेश दिला.
श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी आपल्या सत्संगात भगवान श्री रामदेवजी बाबा (रूणिचा धाम) यांच्या वंशावळीचे गुणगान करीत भगवान श्रीकृष्णाचे उपवतार, श्री रामदेवजी बाबा यांचे वडील अजमलजींच्या भक्ति, शौर्य व बलिदानाचे महत्त्व विस्ताराने निरूपण करीत साधकांना त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्याला स्वतःच्या आत्माचा उद्धार करायचा आहे. स्वतःचे आत्मकल्याण करायचं आहे. मोहमायातून जीव बाहेर निघू शकत नाही त्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल. घनरूपजी यांनी पुरुषार्थ केला आणि एक दिवस समाधी घेतली असे त्यांनी सांगितले.
श्री गोपाल चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले की, धर्मच सत्य आणि सत्यच धर्म आहे. सत्यच ईश्वर आहे. काही लोक धर्म जाणून घेतात परंतु त्यांच्याच गुण नसतात आणि गुण असले तरी ज्ञान नसते. जो प्रजेवर प्रेम करतो, देशाला आपले मानतो तोच राजा असतो. महाराज अजमल जरी राज सिंहासनावर बसले तरी त्यांचे सर्व जनतेवर प्रेम होते. धर्मला आपलेसे करा, गुण मिळवा, ज्ञान मिळवा परंतु हृदय भक्तिमय नसले तर मनुष्य कोरडाच राहतो. जिवनात भक्ती असायला हवी. आपल्यात दया, धर्म सर्व आहे परंतु कुणात ते प्रकट होते तर कुणामध्ये होत नाही असे ते म्हणाले.
विवाहप्रसंगी वेळेचे, मुहूर्ताचे भान ठेवा
आजकाल लोक ब्राह्मणांकडे जातात, मुहूर्त काढतात परंतु लग्न वेळेवर लावत नाही. नंतर मग वैवाहिक आयुष्यात कलह सुरू झाल्याने एकमेकांना दोष देतात. शास्त्राचे पालन करा. वाजतगाजत विवाह करा परंतु वेळेचे भान ठेवा असा सल्ला गोपाल चैतन्यजी महाराज यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, यज्ञ करणे आवश्यक आहे. आपण जरी करीत नसलो तरी साधू आपल्याकडून ते करवून घेतात. साधू जे करतात ते चांगलं करतात. जप यज्ञ, ज्ञान यज्ञ, द्रव यज्ञ असे तीन प्रकारचे यज्ञ असतात. यज्ञ केल्याने पाऊस येतो कारण आपण यज्ञाच्या माध्यमातून देवांना आमंत्रित करीत असतो, असे त्यांनी सांगितले.
भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष
शिवतीर्थ मैदानावर सात दिवस सत्संग समिती अध्यक्ष आ.राजुमामा भोळे आयोजित भगवान श्री रामदेवजी बाबा कथा महोत्सवाच्या प्रारंभी रविवारी दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. गोलाणी मार्केटच्या श्री हनुमान मंदिर पासून हरिनामाच्या गजराने शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली. शिवतीर्थ मैदानावर कथेस्थळी शोभायात्रेचा समारोप झाला. नागरिकांचे शोभायात्रेने लक्ष वेधून घेतले होते.