<
जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगांव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन रविवार, दि. १ मार्च रोजी कांताई सभागृह येथे सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. परिषदेत जातपंचायतींच्या अमानुष अत्याचाराच्या अनुभव कथनांसह त्यावरील उपाययोजनांसाठी जबाबदार समाजघटकांचे प्रतिपादन व्यक्त केले जाणार आहे.
मागील २३ जानेवारी २०२० रोजी जळगाव येथे मानसी बागडे या तरुणीने जात पंचायतीच्या त्रासाला व दहशतीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेतील जबाबदारी संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यापासून अटक होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. कंजारभाट समाजतील जातपंचायतीच्या समांतर न्याय दानाच्या प्रक्रियेमुळे आणि शारीरिक व आर्थिक स्वरुपात दंड करण्याच्या पद्धतीमुळे अनेक समाजबांधव ग्रस्त आहेत.
समाजात जन्माच्या आधीपासून ते मृत्यूनंतर देखील करायला लावल्या जाणाऱ्या विविध रुढी-प्रथा-परंपरांच्या सक्तीसाठी जातपंच अत्यंत आक्रमकपणे कार्यरत आहेत. त्यातून समाजातील ऐच्छिक विवाह, प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह करण्याला आणि नवविवाहीत वधूची कौमार्यभंगाची परीक्षा घेण्यापासून इतर कुठल्याही प्रकारे कालबाह्य झालेल्या परंपरा नाकारायला गेल्यास अमानुष अशा अत्याचाराला सामोरे जावे लागण्याची शेकडो उदाहरणे पुढे आली आहेत. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायतीला मुठमाती अभियानामार्फत घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगांव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठमाती संंकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
परिषदेचे उद्घाटन अत्यंत अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे राहतील. प्रमुख उपस्थितांमध्ये मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कायदा विभागाचे सचिव अॅड. विनायकराव कांबळे, शहराचे आमदार राजुमामा भोळे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जातपंचायतीला मुठमाती अभियानाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे आणि जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी उपस्थित राहतील. परिषदेमध्ये आयोजित पहिल्या सत्रात राज्यभरातुन येणारे कंजारभाट व इतर समाजातील जात पंचायतचे बाधित आपले दाहक अनुभव कथन करणार आहे. त्यामध्ये बंजारा समाजातील लढवय्या कार्यकर्त्या जिजा राठोड आणि सहकारी बोलणार असून या सत्राच्या अध्यक्ष स्थानी शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी कृष्णा इंद्रिकर (मुंबई) हे राहतील.
दुसऱ्या सत्रात जातपंचायतींच्या अन्यायग्रस्त सद्यस्थितीत जबाबदारी काय? या सत्रांतर्गत जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे यांच्या अध्यक्षतेत सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड. रवी जाधव (मुंबई), महाराष्ट्र अंनिसच्या कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. मनिषा महाजन (पुणे), बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे (संगमनेर) हे मान्यवर बोलणार आहेत. परिषदेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅड. दिलीप बोरसे आहेत. त्याअंतर्गत परिषदेच्यावतीने मागण्या व संकल्पाचे ठराव सहभागी संघटना-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मांडून पारित करण्यात येणार आहेत.
जातपंचायतींकडून अन्यायग्रस्त असणाऱ्या बाधित व्यक्ती, कुटूंबानी आणि त्याविरूद्ध लढणाऱ्या विविध जात-जमात समुहातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा महिला असोसिएशन यांच्या वतीने राज्य सरचिटणीस विनायक सावळे, डॉ. ठकसेन गोराणे, राजकुमारी बाल्दी, प्रा. डिगंबर कट्यारे, अॅड. भरत गुजर, विश्वजीत चौधरी आदीं पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.