<
जळगाव-(प्रतिनिधी) – महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीत होणारी वाढ महावितरणच्या एकूण आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल. दरमहा वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात १०० टक्के पुर्ण करणे आवश्यक आहे. वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारी आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुली मोहिमेला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कोकण प्रादेशिक विभागातून फेब्रुवारी-२०२० या महिन्यात वीजबिलाचे २३१७.४७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. मात्र २७ फेब्रुवारीपर्यंत यातील २०५७.८३ कोटी रुपयेच वसूल होऊ शकले. याशिवाय एप्रिल २०१९ पासूनचे ३७० कोटी आणि चालू विजबिलाची उर्वरित रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. वसुली मोहिमेला गती देऊन ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश श्री. नाळे यांनी दिले आहेत. तसेच मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेऊन नियमानुसार व वेळेत कारवाई पूर्ण करावी, त्याबाबत फेर पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.या बैठकीला मुख्य अभियंते सर्वश्री दीपक कुमठेकर, दिनेश अग्रवाल, ब्रिजपालसिंह जनवीर, श्रीमती पुष्पा चव्हाण व रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.