<
दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढत चाललेले असून, विज्ञानात येत असलेल्या नवनवीन अशक्य वाटत होत्या आज त्याच गोष्टी तो साध्य करून त्यात नवनवीन सकारात्मक बदल करत आहे ही खऱ्या अर्थाने आमूलाग्र क्रांती विज्ञान युगाला नमन करणारी आहे.
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणार्थ तसेच समाजाने विज्ञानाचे महत्त्व समजून त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करावा हा उद्देश आहे.लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे.सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे.लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी साजरा केला जातो.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. यातील एक म्हणजे दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.डॉ वसंतराव गोवारीकर यांच्या मनात आले की,भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ सी व्ही रामन यांना मिळाला आहे.तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्मदिन अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला. ती तारीख का निवडू नये?अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी आणि तेव्हापासूनच आपण २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतात साजरा करत असतो.
डॉ रामण यांच्या संशोधनाविषयी;कोणत्याही वस्तूवर क्षणभरासाठी लेझर प्रकाश पाडायचा आणि तो प्रकाश संपताच वस्तूमधील निर्माण झालेल्या विकिरणांच्या प्रकाशाची नोंद घ्यायची. याला रामण वर्णपट असे म्हणतात. रामण वर्णपटाचा अभ्यास जगामध्ये अनेक जणांनी केला. अनेक वस्तुंवर केला. त्यामुळे वस्तूंमध्ये असणाऱ्या नेमक्या रसायनांचा पत्ता लागू शकतो.रसायन अगदी अल्प मात्रेमध्ये असले तरी ओळखता येऊ शकते आणि त्यासाठी आता तो पदार्थ कापायची,चिरायची किंवा रसायनांनी त्याचे विश्लेषण करायची गरज उरली नाही.लेझर किरण इलेक्ट्रॉनिक संवेदक आणि वेगाने गणिती तपासणी करणारे संगणक यांच्यामुळे रामन वर्णपटाचे विश्लेषण अधिक सोपे,चटकन व अचूक तपासणी करण्याची क्षमता आपल्याला मिळाली की अल्प प्रमाणात असलेली भेसळ सुद्धा सहज ओळखता येईल.अनेक रासायनिक क्रिया पूर्ण झाल्या की नाही ?किवा त्या रासायनिक क्रियेत कोणकोणते टप्पे आहेत? हे सुद्धा रामन वर्णपटाच्या अभ्यासामुळे आपल्याला समजू शकेल. लेझर किरण,इलेक्ट्रॉनिक डिटेक्टर आणि झटपट आकडेमोड करणारे संगणक यांमध्ये आता भारतही वरच्या स्थानावर सरकला आहे.रामन वर्णपट हा अशाप्रकारे जगाचे चित्र बदलणारा एक मोठा शोध आहे. त्या शोधाला सन्मान देण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय दिन साजरा केला जातो.
पण फक्त साजरा करून चालणार नाही आपल्याला विज्ञानाची कास धरावी लागेल. आजचे युग विज्ञान युग आहे असे आपण सहज म्हणतो,पण यात आपण किती सहभागी होतो याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे.या दिनी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण विज्ञानाचा प्रचार प्रसार करायला हवा. विज्ञानाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना,संशोधन,प्रयोग,वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयी माहिती देऊन, त्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी.यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रत्येक शोधाची-संशोधनाची सुरुवात एका छोट्याशा विचाराने व लहान प्रयोगातून होत असते.प्रत्येक गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टिकोन हवा याविषयी आपण समाजात विज्ञानाविषयक जनजागृती करायला हवी. आपल्याला माहितीच आहे की न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे एखाद्या झाड़ावरून फळ खाली पडते आणि ते न्यूटन बघत असतात आणि हे फळ खालीच का पडलं ? या एका लहान विचाराने त्याना पडलेल्या एका प्रश्नामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि आज त्यावर विविध संशोधन चालू आहेत. दुसरे उदाहरण द्यायचे म्हटल्यास चुंबकाच्या शोधाबद्दल एक दंतकथा आहे असे म्हणतात की ग्रीस देशात राहणारा एक माग्निस नावाचा एक मेंढपाळ होता एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असतांना. एका मोठ्या खडकावर बसला होता.परत जाण्याच्या वेळी तो दगडावर उठला तर काय आश्चर्य त्याची काठी आणि त्याचे बूट दगडाला चिकटून बसले होते.दगडापासून बाजूला होताना त्याला खूप त्रास झाला आणि त्याच्या काठितील लोखंड व बुटातील लोखंडी खिळे त्यामुळे असे होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. पण इतर खडकावर मात्र तस होत नाही.त्याच्या बुटाला व काठिला ते चिटकले नाही.त्यानंतर त्यांनी तो खडक सर्वांना दाखवला हा शोध लावणारे मेंढपाळाच्या नावावरून खडकाचे मॅग्नेटाइट असे नाव पडले मॅग्नेटाइट हात नैसर्गिक चुंबक आहे हा शोध ग्रेसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळे हि मॅग्नेटाइट हे नाव पडले असावे. यावरूनच आपल्या लक्षात येते की एखाद्या लहान गोष्टीतुन सुद्धा आपण नवीन नवीन संशोधनाला जन्म देऊ शकतो.
आजचा राष्ट्रिय विज्ञान दिवस आपण संपूर्ण भारतात साजरा करत असताना आपण भारताच्या भावी पिढीला विज्ञानाविषयी जागृत करून त्यांना विज्ञाना विषयात गोड़ी निर्माण करून त्यांना विज्ञानाचे लहान लहान प्रयोग स्वतः कृतितुन करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
कारण भारतात एकच सी. व्ही.रामन नको प्रत्येक भारतीय भावी पिढितुन प्रत्येक व्यक्ति नोबेल पुरस्कार विजेता असायला हवा,भारताला संपूर्ण जगात नावलौकिक मिळवून देणारा आणि भारत देशाला जगातील एक महासत्ता बनवणारा असावा.
– मनोज भालेराव (शिक्षक) प्रगती विद्यामंदिर,जळगाव मो.नं ८४२१४६५५६१