<
पोस्टरचे महिला मान्यवरांच्या हस्ते अनावरण : जिल्हाभर लावणार पोस्टर
जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात नुकतेच एक 65 वर्षीय महिला कारच्या आडोशाला लघुशंकेला बसल्याने तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराची तात्काळ दखल घेत निधी फाऊंडेशनच्या वैशाली विसपुते यांनी महिला स्वच्छतागृहांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. निधी फाऊंडेशनतर्फे तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण शनिवारी महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भोईटेनगर स्थित निधी फाऊंडेशनच्या आवारात करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहराच्या प्रथम नागरिक महापौर भारती सोनवणे, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, डॉ.श्रध्दा चांडक, आयएनआयएफडीच्या संचालिका संगीता पाटील उपस्थित होत्या.
राईट टू पी कायद्यानुसार कोणत्याही हॉटेल किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह महिलांना मोफत वापरू देणे बंधनकारक आहे. बहुतांश महिलांना याबाबत माहिती नसल्याने त्या लघुशंका रोखून ठेवतात किंवा आडोसा शोधतात. लघुशंका रोखून ठेवल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हॉटेल्स किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महिलांना लक्ष द्या.. या मथळ्याखाली काही पोस्टर फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी तयार केले आहे. शनिवारी त्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी जळगाव महिला व बाल सहाय्य कक्षाच्या समन्वयक विद्या सोनार, शोभा हंडोरे, भुसावळच्या समन्वयक भारती रंधे, साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, निवेदिता ताठे, स्मिता वेद, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या हेतल वाणी, स्वाती सोनगिरे आदी उपस्थित होत्या.
उपक्रमाचे कौतुक, सहकार्याचे आश्वासन
निधी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात महिलांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत सर्व महिला मान्यवरांनी व्यक्त केले. महानगरपालिकेतर्फे याबाबत आदेश पारीत करण्याचे आश्वासन महापौर भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी दिले. तसेच उपक्रमासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके यांनी दिले.
खा.सुप्रिया सुळेंकडून फेसबुक पोस्ट शेअर
राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांना घडलेल्या घटनेची आणि निधी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार्या उपक्रमाची वैशाली विसपुते यांनी माहिती दिली. खा.सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत राज्यस्तरावर देखील त्याची दखल घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, खा.सुप्रिया सुळे यांनी निधी फाऊंडेशनच्या उपक्रमाची दखल घेत पोस्टर अनावरणचा फोटो त्यांच्या फेसबुक पेजवरून देखील शेअर केला.