<
भव्य महाआरतीने भगवान रामदेवजी बाबा कथेचा समारोप
जळगाव-(प्रतिनिधी) – भगवान रामदेवजी बाबा स्वतः देव आहेत आणि सोबत लक्ष्मी माता देखील आहे. ज्याठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो तिथे धनाची कोणतीही कमी नसते. धरतीवर जेव्हा जेव्हा पाप वाढतो. राक्षसी लोकांमुळे भक्त आणि ब्राम्हणांना त्रास होतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी जन्म घेतो. भैरव राक्षसाचा वध करणे आणि सर्व जाती धर्मातील भेदभाव दूर करण्याचा भगवान रामदेव यांनी प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीला प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले असे श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांनी भाविकांना निरूपण करताना सांगितले.
येथील शिवतीर्थ मैदानावर आमदार राजुमामा भोळे, श्री रामदेवजी बाबा सत्संग समिति आणि चैतन्य साधक परिवार समितितर्फे आयोजित सात दिवसीय भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृत सत्संगाचा शनिवारी समारोप झाला.
श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी पुढे सांगितले की, अनेक लोकांना आपल्या आत्म्याचे, परमात्म्याचे आणि आपण पृथ्वीवर का आलो आहे याची लोकांना जाणीव होण्यासाठी भगवान रामदेवजी बाबा देखील कथा, सत्संग करायचे. आपण मानव जन्म घेवून पृथ्वीवर आलो आहेत तर हरी भजन करायला हवे. हरी भजनात सार आहे. भगवान सांगतात आपण ईश्वराचे अंश आहात. आपली आत्मा परमेश्वराचा अंश आहे. जेव्हा मनातील भेद मिटतो तेव्हा तो स्वतःलाच ब्रम्ह समजतो, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते महाआरती
भगवान रामदेवजी बाबा यांच्या कथेच्या समारोपप्रसंगी महाआरती करण्यात आली. सुरूवातीला कथेसाठी सहकार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महाआरतीप्रसंगी आ.राजुमामा भोळे, आ.चंदुभाई पटेल, आ.लताताई सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राजु बांगर आदींसह इतर मान्यवर, संत, महाराज उपस्थित होते.