<
ठेकेदारांना दिल्या सूचना : लवकरात लवकर कामे करण्याची ताकीद
जळगाव – शहरात अनेक ठिकाणी रखडलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात झाली आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी मनपा अधिकार्यांसह विविध प्रभागात जावून विकास कामांची पाहणी केली. यावेळी ठेकेदारांना सूचना देत कामे लवकरात लवकर पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद देखील त्यांनी दिली.
सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला पाहणी दौरा दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी महापौर भारती सोनवणे यांच्यासोबत नगरसेवक कैलास सोनवणे, प्रतिभा देशमुख, प्रतिभा पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील, मयुर कापसे, सुधीर पाटील, मनोज काळे, मनपा शहर अभियंता सुनील भोळे, बांधकाम अभियंता योगेश वाणी, पाणी पुरवठा अभियंता नरेंद्र जावळे आदी उपस्थित होते.
तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या सूचना
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने शिवाजीनगर हनुमान मंदिराकडून रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या मार्गाने होणारी वाहतूक वखारीकडून होत आहे. दरम्यान, त्याठिकाणी रस्ता खोदलेला असल्याने दिवसभर मोठ्याप्रमाणावर नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतो. महापौर भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्याने वळणावर तात्पुरता 7 मीटरचा डांबरी रस्ता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गटारींच्या कामात गुणवत्ता राखा
द्वारका नगर, पिंप्राळ्यातील श्रीराम समर्थ कॉलनी, घनश्याम नगर, आरएमएस कॉलनी परिसरातील गटारींच्या कामांचा महापौर भारती सोनवणे यांनी आढावा घेतला. मनुदेवी सोसायटी परिसरातील वृदांवन अपार्टमेंटलगत एका मोकळ्या प्लॉटवर परिसरातील सर्व सांडपाणी साचत असल्याने खदाणप्रमाणे मोठे डबके साचले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी त्याठिकाणी पाहणी करून संबंधित जागा मालकाला मनपा प्रशासनाकडून नोटीस पाठवण्याची सूचना केली.
उद्यानांच्या सुशोभिकरणाची पाहणी
मुक्ताईनगर परिसरात ऑक्सिजन पार्क साकारण्यात येत असून त्याठिकाणी महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली व उद्यानाला लवकरात लवकर संरक्षण जाळी आणि प्रवेशद्वार बसविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच हायवेदर्शन कॉलनी आणि खोटेनगरातील उद्यानाच्या कामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.