<
जिल्ह्यात अंत्योदय योजनेत 5 हजार शिधापत्रिका तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींमध्ये 80 हजार लाभार्थ्यांचामावेश करण्यात येणार
जळगाव, (जिमाका) दि. 4 – जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळालेच पाहिजे, यासाठी सर्व स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा विभागाचे नियंत्रण व लक्ष आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवताना काही अनियमितता आढळल्यास त्या दुकान मालकांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या मासिक बैठकीत दिली.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, यांचेसह समितीचे सदस्य व जिल्हा पुरवठा शाखेतील कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी पुढे म्हणाले की, अंत्योदय योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी त्या योजनेचा लाभार्थी निवडताना शासनाच्या आवश्यक सुचनांची दक्षता घेण्यात येत आहे. कोणत्याही गरजू लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी पुरवठा विभाग आवश्यक ती कार्यवाही करीत असल्याचेही सुर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितले. जिल्ह्यात अंत्योदय योजनेत अजून 5 हजार शिधापत्रिका तर प्राधान्य कुटूंब लाभार्थीमध्ये 80 हजार लाभार्थ्यांचा समावेश करता येणार असून लाभार्थी निवडताना पारदर्शीपणा राखला जाणार असल्याचेही श्री. सुर्यवंशी यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 1 लाख 37 हजार 748, प्राधान्य कुटूंब लाभार्थी 4 लाख 70 हजार 299, एपीएल 3 लाख 12 हजार 649 तर शुभ्र रेशनकार्डधारक 74 हजार 457 असे एकूण 9 लाख 95 हजार 147 लाभार्थी आहेत. तर जिल्ह्यात 1 हजार 938 रास्त भाव दुकाने आहेत. त्यापैकी 1 हजार 791 दुकाने कार्यान्वित आहेत तर 147 दुकाने अकार्यान्वित असून अकार्यान्वित दुकाने कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने धान्य वितरण होत असल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची बचत झाल्याची माहितीही श्री. सुर्यवंशी यांनी बैठकीत दिली.