<
महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते ‘सशक्त महिला सन्मान’
जळगाव : होय, आम्ही स्वावलंबी आहोत, आम्ही सक्षम आहोत तसेच नारी शक्ती जिंदाबाद असे म्हणत महिलांनी शहरातून भव्य दुचाकी रॅली काढली. महिला सक्षमीकरण आणि प्लास्टिक निर्मूलन हि थीम घेत दुचाकी रॅलीतून प्रबोधन करण्यात आले. या रॅलीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. त्याआधी शिवतीर्थ मैदानावर 2 महिलांना महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते ‘सशक्त महिला सन्मान’ देऊन गौरवण्यात आले.
येथील जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन / समिती श्री न्यू शहर यांच्या सहकार्याने दि. ४ मार्च रोजी शहरातून महिलांची “वूमन्स ओन व्हील्स” हि दुचाकी रॅली शिवतीर्थ मैदानावरून काढण्यात आली. या रॅलीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर रॅलीत जनजागृती करण्यात आली.
सर्वप्रथम अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाकडून जळगाव जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे कार्य करणा-या राजकुमारी बाल्दी, निर्मला सेठीया या दोन महिलांना सशक्त महिला सन्मान प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बाल्दी, उपाध्यक्ष तथा प्रकल्प प्रमुख भारती पाथरकर व बिंदीया नांदेडकर, तेरापंथ महिला मंडळ अध्यक्ष निर्मला छाजेड, सचिव रिटा बैद आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन / समिती श्री शहरच्या निर्मला जोशी, रत्ना झंवर मंचावर उपस्थित होते.
निर्मला छाजेड यांनी प्रस्तावना केली. मंगलाचारण तेरपंथी महिला मंडळाने केली. महिला असोसिएशन च्या कार्याची भारती पाथरकर यांनी माहिती दिली. महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० हून अधिक वर्षे झाली आहे. परंतु, आजच्या काळातही हुंडाबळी, स्त्री अत्त्याचार सारख्या घटना घडत आहेत. तसेच लिंग भेदभाव अजूनही आहे. या घटना कुठेतरी कमी झाल्या पाहिजे, असे प्रतिपादन महापौर भारती सोनवणे यांनी केले. तसेच त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजकुमारी बालदी यांनी, महिलांनी स्वतः मध्ये, सहकाऱ्यांमध्ये व मुलांमध्ये वेदना, संवेदना, श्रम यासारखे गुण विकसित केले पाहिजे तेव्हाच प्रत्येक वर्ग सक्षम होईल असे सांगितले. महिला सक्षमीकरण गीत तेरापंथी महिला मंडळाने सादर केले. आचार्य तुलसी यांनी दिलेला महिला सक्षमीकरण संदेश यावेळी नम्रता सेठिया यांनी वाचुन दाखविला. सन्मानपत्र वाचन रिटा बैद यांनी केले. आभार बिंदीया नांदेडकर यांनी मानले.
त्यानंतर रॅलीला महापौरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत महापौर यांनीदेखील सहभाग घेतला. रॅलीत महिलांनी केशरी साडी व युवतींना सफेद ड्रेस, लाल ओढणी असा ड्रेसकोड होता. रॅलीत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलांनी प्लास्टिक निर्मूलन आणि महिला सशक्तीकरण याविषयी जनजागृती करणारे फलक हाती घेतले होते. रॅलीत सहभागी महिलांना महापौर भारती सोनवणे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. रॅली शिवतीर्थ मैदान, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक मार्गे पुन्हा शिवतीर्थ मैदानावर समाप्त झाली. प्रकल्पप्रमुख भारती पाथरकर, बिंदिया नांदेडकर, उर्मिला छाजेड यांनी यशस्वी नियोजन केले.
महिला असोसिएशनच्या मंगला नगरकर, ज्योत्स्ना ब-हाटे, डॉ.हेमलता रोकडे, कमल पाटील, चंद्रकला परदेशी, राजकमल पाटील, मिनाक्षी वाणी, निर्मला जोशी, यास्मिन मेहंदी, आझमी मेहंदी, वैशाली पाटील, लता ओझा, यांच्यासह तेरापंथ महिला मंडळच्या नम्रता सेठीया, विनिता समदडिया, संतोष छाजेड, तर सुराणा, शशी सुराणा आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनच्या विद्या वर्मा, किरण स्वर्णकार, विमला दायमा, यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वधर्म समभाव महिला मंडळ, वनिता विश्व महिला मंडळ, जागृती महिला मंडळ यांच्यासह 20 मंडळांनी परिश्रम घेतले.