<
म्हसावद येथे जि.प.सदस्य पवन सोनवणे यांच्या हस्ते झाला गौरव
जळगाव - (प्रतिनिधी)-तालुक्यातील समूह साधन केंद्र म्हसावद ता.जळगाव तर्फे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी म्हसावद केंद्रातील जिल्हा परिषद शाळा बिलवाडी येथून नुकतीच बदली झालेले उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक संदिप पाटील यांचा म्हसावद समूह साधन केंद्रातर्फे आयोजित शिक्षण परिषदेत उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल "शिक्षक सन्मान पत्र" देऊन गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे,जळगाव पंचायत समिती सदस्य संगीताताई समाधान चिंचोरे,म्हसावद च्या सरपंच मीनाताई महेंद्र चिंचोरे,केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे,प्राचार्य पी.डी.पाटील व म्हसावद केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
म्हसावद समूह साधन केंद्राची शैक्षणिक परिषद थेपडे हायस्कूल,म्हसावद येथे आयोजित करण्यात आली होती.यात विविध शैक्षणिक बाबींवर चर्चा करण्यात आली.यावेळी म्हसावद केंद्रात बिलवाडी येथे शिक्षक पदावर असताना शिक्षक संदिप पाटील यांनी तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात योग्य वापर करून डिजिटल शाळा,विद्यार्थी तंत्रस्नेही करणे,शैक्षणिक साहित्य निर्माण करणे,गुणवत्ता वाढीसाठी दप्तरमुक्त शनिवार,शाळा आपल्या दारी,पढाई पे चर्चा,खेळातून शिक्षणाकडे यासारखे असंख्य उपक्रम राबविले,यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य गौरव व कौतुक करणे आवश्यक असल्याचे मत केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी यावेळी सांगितले.शिक्षण परिषदेत थेपडे हायस्कूल चे उपशिक्षक पी.पी.मगरे यांनी ज्ञानरचनावाद पद्धतीवर आधारित नमुना पाठ घेतला,इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्ती वर चर्चा व प्रश्ननिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.इंग्रजी भाषा आवड निर्माण होण्यासाठी शासनाच्या टॅग प्रशिक्षण वर चर्चा करण्यात आली.
या परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी केले.सुत्रसंचलन प्रेमकुमार गायकवाड व आभार एस.एम.पिंगळे यांनी मानले.प्राचार्य पी.डी.पाटील व थेपडे हायस्कूल च्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी नियोजन व व्यवस्थापन साठी परिश्रम घेतले.