<
कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी सज्ज होवूया, जागृत राहूया, लढा देवूया
जळगाव – (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव व नेहरु युवा केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला समानता व सशक्तीकरण एकीकृत कार्यक्रमातंर्गत स्त्री जागर अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आम्ही मैत्रीणी ग्रुपच्या व जळगाव आकाशवाणी केंद्राच्या निवृत्त उद्घोषिका डॉ.उषा शर्मा, हेमाताई अमळकर, संपादिका शांता वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार्या 15 सामाजिक संस्था, महिला मंडळ, सहकारी संस्था व महिला महाविद्यालय यांचा स्त्रीशक्ती सन्मानाने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर निधी फाऊंडेशनच्या वैशालीताई विसपुते, आधार संस्थेच्या भारतीताई पाटील, माहेर संस्थेच्या शैलाताई चौधरी, परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप (जळगाव), आधार बहुउद्देशीय संस्था (अमळनेर), निधी फाऊंडेशन (जळगाव), वुमन अॅण्ड चाईल्ड केअर प्लस (जळगाव), रुशिल फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र (जळगाव), बॉक्स ऑफ हेल्थ फाऊंडेशन (जळगाव), उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्था (जळगाव), वनिता विश्व महिला मंडळ (जळगाव), श्री भक्ती महिला मंडळ (जळगाव), मेढ क्षत्रिय सोनार महिला मंडळ (जळगाव), क्रीडा विभाग, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (जळगाव), परिचारिका प्रशिक्षण महिला महाविद्यालय (जळगाव) या संस्थांना स्त्रीशक्ती सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सज्ज होवूया, जागृत राहूया, लढा देवूया असा संकल्प करून कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी महिला मंडळे व संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी कोरोना व्हायरस जनजागृतीसाठी नेहरु युवा केंद्राच्यावतीने भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले तर आभार नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले. याप्रसंगी स्त्रीशक्तीचा जाग करणारे पथनाट्य विनोद ढगे आणि सहकारी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी सादर केले.