<
जळगांव-(प्रतिनिधी)- आरोग्यम धनसंपदा या ब्रीदवाक्यानुसार आरोग्य हीच मानवी जीवनातील खरी संपत्ती असून ही संपत्ती चिरकाल टिकून राहावी या उद्देशाने गुजरात मधील तीलकवाडा जिल्ह्यातील नर्मदा परिक्रमा स्थान येथील स्वामी वासुदेवानंद सरस्वती आश्रम(वासुदेव कुटीर) व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर नुकतेच मोठया उत्साहात संपन्न झाले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन स्वामी विष्णूगिरी महाराज, स्वामी चंद्रमौली, गुजरात रिजनल हेल्थ डायरेक्टर डॉ. इटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुबोध, जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.बी.संदेश विभागाचे अमित माळी यांच्या हस्ते श्री धन्वंतरी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी गुजरात व महाराष्ट्र राज्यातील तज्ञ डॉक्टरवर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होती.
तिलकवाडा जिल्यातील मागासवर्गीय भागातील सुमारे २००० रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आली. तसेच ४१ जणांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व ६९१ जणांना चष्मे यावेळी वाटप करण्यात आले. तसेच हृदयरोग, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग, संधीवात, नेत्र, दंत, त्वचारोग, दुर्मिळ आजार अशा विविध तपासण्या देखील यावेळी मोफत करण्यात आल्या. यावेळी, डॉ.श्रद्धा माळी, डॉ.श्रेयस महाजन माधवबाग जळगांव, डॉ.वर्षा व डॉ. बाळासाहेब मानकर पुणे, डॉ.आदिती देशपांडे पुणे, डॉ.अविनाश पठारे नगर, डॉ.वारिया बडोदा, डॉ.मोहंता कोशमीरे नाशिक, डॉ.शिवानी महाडिक मुंबई, बडोदा सिव्हिलची टीम, डॉ.उमेश मोरे तर औषधीसाठी मिलिंद परांजपे बडोदा, गिरीश शर्मा तिलकवाडा, अपर्णा खामकर मुंबई, शुभांगी महाडिक मुंबई, काश्मिरी कावरे पुणे आदी डॉ. उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिराला शंकर आय हॉस्पिटल मोगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वामी विष्णूगिरीजी महाराज व स्वामी चांद्रमोली यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर झाले तर शिबिराचे प्रास्ताविक संकल्पना अमित माळी यांनी मांडली.