<
तांबापुरातील रहिवासी जिव धोक्यात घालून टाकतात आकोडे
जळगांव(चेतन निंबोळकर)- जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी आपल्याला शहरातील मेहरूण परिसरातील तांबापुरा भागात दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) ३३/११ के.व्ही. उपकेंद्र महाबळ, मेहरूणच्या अंतर्गत येणाऱ्या तांबापुरा भागात मोठया प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांसह कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनाही थेट वीज खांबावरून अनधिकृतपणे पुरवठा सुरू करून दिला जात असून ते संबंधित वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची साथ असल्याशिवाय शक्य नसल्याचे सुज्ञ नागरिकांत चर्चा आहे. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात वीज चोरी होत आहे. यावर आळा घालण्यासाठी वीज कंपन्यांकडून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वीज चोरांच्या विरोधात कारवाई होते. मात्र, त्यानंतरही हव्या त्या प्रमाणात वीज चोरी कमी होत नसल्याचे या चित्रांवरुन स्पष्ट होते. या चोरीचा भुर्दंड इतर सामान्य ग्राहकांना जास्त वीजबिलातून सहन करावा लागत असल्याच असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले की, थेट कंत्राटी किंवा कायम वीज कर्मचाऱ्यांचीच मदत घेऊन हे ग्राहक वीज चोरी करत असल्याच्या तक्रारी आहेत. वीज चोरांवर महावितरणच्या आशीर्वादाने कसलीच करवाई अथवा उपाययोजना होत नसल्याने सर्रास आकोडे टाकून, मिटरमध्ये छेडछाड केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरी ही होत आहे. होणारी वीज चोरी रोखण्यासाठी येथील महावितरणचे अधिकारी हे दुर्लक्ष करीत असतात. आता तरी मेहरूण महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाग येऊन कारवाई करतील का याकडे मात्र लक्ष लागून आहे.
वीज चोरीमुळे घडतात हे प्रकार
वीज चोरीमुळे विजेचा भार कमी जास्त होणे, वारंवार शार्टसर्किट होणे, आग लागणे, रोहित्र जळणे असे प्रकार होत असल्याने अखंडित सेवा देण्यास महावितरणला अडथळा निर्माण होतो.
सरकारी कार्यालय की बेवारस कुत्र्यांचे माहेरघर
कुत्र्यांनी माणसावर हल्ला करण्याच्या किंवा चावा घेण्याच्या प्रकारात वाढ होत असतानाही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) ३३/११ के.व्ही. उपकेंद्र महाबळ मेहरूण येथील कार्यालयात चक्क कुत्रे झोपा काढतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात अधिकारी कर्मचारी काम करत असताना देखील कुत्रे पंख्याच्या हवेत सुस्तावलेले दिसून आले.