<
जळगांव(चेतन निंबोळकर)- जळगांव शहरात लोकप्रतिनीधीं कडून सामान्य जनतेचा वारंवार होणारा अपेक्षाभंग हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे. आपली लोकशाही व्यवस्था जगात किती उत्तम आहे, अशा बाता नेहमी मारल्या जातात, पण प्रत्यक्षात ही व्यवस्था खरेच सक्षमपणे काम करते का, या प्रश्नाचे उत्तर अनेकदा “नाही” असेच येते. अशातच महामारीसारखे कोरोनाचे संकट जगावर, भारतावर आणि जळगाव वर थैमान घालत आहे. अशा वेळी जळगांव शहराचे लोकप्रतिनीधी नगरसेवक, आमदार, खासदार मात्र गायब झाल्याचे चित्र शहरवासीयांना दिसून येत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील विविध सामाजिक संस्था गरिब गरजूंना तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना शक्य तेवढी मदत करताना दिसून येत आहे तर एकीकडे सामान्य नागरिकांचे हक्काचे लोकप्रतीनिधी मात्र चक्क रफूचक्कर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील जे सामान्य नागरिकांची हातमजूरीवर चूल पेटते अशा नागरिकांची आता एक एक दिवस घरातील सर्व डबे झटकून सांज निभवताना दिसत आहे. ही भयानक अवस्था कधी युद्ध काळातही आली नाही. म्हणून काही समाजसेवक आणि संस्था या दुःखाला मलम म्हणून काहीतरी वाटप करून गरीबांच्या घशात घालतांना दिसून येत आहेत. परंतू जळगांव शहरातील जनसामान्यांचे हक्काचे लोकप्रतिनीधी जे आजपर्यंत एखाद्या कामाच्या ठेक्या साठी एकमेकांची कॉलर धरतात, प्रत्येक समारंभाला देणगी देतात, ते मात्र गायब आहेत. यामागे काय रहस्य आहे? कदाचित लोकप्रतिनीधी म्हणत असतील, नागरिकांचा आणि आमचा संबंध निवडणूक पुरताच. आणि तो व्यवहार आम्ही मताचे पाचशे रुपये देऊन रोखीने केला आहे. म्हणून जळगांव शहरातील लोकप्रतिनीधी बिळात घुसून बसले असावेत का? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांत उपस्थित होत आहे. का या कोरोना ऐवजी भुकेने माणसं मेल्यावर लोकप्रतिनीधी फक्त सांत्वन करायला येतील का? अशी देखील चर्चा जनमाणसांत रंगली आहे.