<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. महसूल विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. ज्या प्रमाणे दररोज एखाद्या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची शाळा भरते त्याचप्रमाणे गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा करणार्यांची शाळा दररोजच भरत आहे.
महसूल विभाग थातूरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत. अवैध वाळू वाहतूकीच्या बाबतीत कितीतरी तक्रारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक च्या बाबतीत एक दोन दिवसा आड वृत्त प्रसिद्ध होत असतात तरी देखील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही.
महसूल विभागाच्या कामकाजावर नेहमीच प्रश्न चिन्ह निर्माण होत असतो. पण सद्यस्थितीत तर जळगावकरांना प्रश्न पडलाय की “जिल्हाधिकारी” आहेत की नाही? कारण वाळू उपसा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की जर हा वाळू उपसा एखाद्या परवाना धारकाने उपसा केला असता तर कोट्यावधी रुपये महसूल मिळाला असता. पण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना काही एक फरक पडतांना दिसुन येत नाही.
नदीपात्रात ज्या ज्या ठिकाणी वाळू गट आहेत त्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जळगावकरांकडुन सातत्याने होत आहे परंतु महसूल विभाग याकडे देखील काना डोळा करुन नेहमी दुर्लक्ष करित आहे.